देशात सध्या करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अशा परिस्थितीत देशातील वैज्ञानिक दिवसरात्र एक करून करोनावरील लस विकसित करत आहेत. त्यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर विकसित करत असलेल्या कोवॅक्सीन या लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणींमध्ये लस सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. चाचणीच्या प्राथमिक टप्प्यातील निकालांनुसार ही लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. देशातील काही शहरांमध्ये भारत बायोटेक आणि झायडस कॅडिला या कंपन्यांच्या लसीच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

भारतातील १२ शहरांमध्ये ३७५ स्वयंसेवकांवर करोना लसीची चाचणी करण्यात आली. प्रत्येक स्वयंसेवकाला या लसीचे दोन डोस देण्यात आले. यानंतर त्यांना सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. “ही करोना लस संपूर्णपणे सुरक्षित आहे. आम्ही जेवढ्या स्वयंसेवकांना ही लस दिली त्यांच्यावर कोणतेही साईडइफेक्ट्स जाणवले नाहीत,” अशी माहिती पीजीआय रोहतकमध्ये सुरू असलेल्या चाचणीच्या टीम लीडर सविता वर्मा यांनी दिली.

आता स्वयंसेवकांना लसीचा दुसरा डोस देण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या रक्ताचे नमूने गोळा करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. रक्ताच्या नमून्यांद्वारे लसीच्या इम्युनॉडेनिसिटीचा अभ्यास करण्यात येणार आहे.

दुसऱ्या टप्प्याला सुरूवात

“ही लस संपूर्णपणे सुरक्षित आहे याची आम्हाला खात्री झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ही लस किती प्रभावशाली ठरते हे पाहिलं जाणार आहे. त्यासाठी आम्ही रक्ताचे नमूने घेण्यास सुरूवात केली आहे,” असं सविता वर्मा म्हणाल्या.

एम्समध्ये १६ स्वयंसेवकांवर चाचणी

“ही लस सुरक्षित आहे. एम्समध्ये भारत बायोटेकच्या लसीच्या चाचणीसाठी १६ स्वयंसेवकांना दाखल करण्यात आलं होतं,” अशी माहिती दिल्लीतील एम्सचे प्रमुख संजय राय सांगितलं. सध्या जगभरात अनेक देशांमध्ये करोनाची लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच सरकारही या प्रक्रियेवल लक्ष ठेवून आहे. कोवॅक्सिन ही देशातील पहिली लस असून भारत बायोटेकद्वारे आयसीएमआरसोबत ही लस विकसित करण्यात येत आहे. सर्व १२ ठिकाणी या लसीच्या सुरक्षिततेचे निकाल पाहिल्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाशी कंपनी दुसऱ्या टप्प्यात संपर्क साधणार आहे. जर सर्व बाबी योग्य असतील तर पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये ही लस उपलब्ध होईल, अशी माहिती एका वैज्ञानिकानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.