तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु असतानाच भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ लसीला मान्यता देण्यात आली आहे. त्यावरुन काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ऑक्सफोर्डने विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन’ या दोन करोना प्रतिबंधक लसींच्या मर्यादित आपत्कालीन वापरास सरकारने परवानगी दिली आहे.

‘कोव्हॅक्सीन’च्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु असताना लसीला मान्यता कशी दिली ? हा प्रश्न काहींनी उपस्थित केला आहे. काँग्रेस ज्येष्ठ नेते जयराम रमेश व शशी थरूर यांनी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनला मान्यता देण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. “कोव्हॅक्सीनच्या अद्याप तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झालेल्या नाहीत. या वॅक्सीनला अगोदरच मान्यता दिली गेली आहे. हे धोकादायक ठरू शकतं. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यायला हवं. सर्व चाचण्या होईपर्यंत याचा वापर करणं टाळायला हवं. दरम्यान भारत अ‍ॅस्ट्रॅजेनेका वॅक्सीनसह मोहीम सुरू करू शकतो” असं शशी थरूर यांनी म्हटलं होतं.

‘कोव्हॅक्सीन’ला लवकर मान्यता दिल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना आता भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी उत्तर दिलं आहे. “लस निर्मितीच्या अनुभवाशिवाय आमची कंपनी बनलेली नाही. लस निर्मितीचा आमच्याकडे प्रचंड अनुभव आहे. १२३ देशात आम्ही पोहोचलेलो आहोत. इतक प्रदीर्घ अनुभव असलेली आमची एकमेव कंपनी आहे” असे कृष्णा इल्ला यांनी सांगितले.