करोना लसीकरणाच्या मोहिमेमध्ये भारताला लवकरच आणखीन एक यश मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. कोवॅक्सीन बनवणाऱ्या हैदराबादमधील भारत बायटेकची निर्मिती असणाऱ्या आणि नकाद्वारे दिल्या जाणाऱ्या लसीची चाचणी पुढील आठवड्यापासून सुरु होणार असल्याचे वृत्त इंडिया टीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. या लसीचं नाव बीबीव्ही१५४ असं आहे. ही इंटरनेझल म्हणजेच नाकावाटे देण्यात येणारी लस आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सेंट्रल ड्रग्ज कंट्रोल ऑर्गनायजेशनने (सीडीएससीओ) भारत बायोटेकला या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी करण्याची परवानगी दिली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार या लसीच्या चाचणीची सर्व प्राथमिक प्रकिया पूर्ण झाली असून पुढील आठवड्यामध्ये या लसीची प्राथमिक चाचणी होणार असून यासाठी चार मोठ्या शहरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पाटणा, चेन्नई, नागपूर आणि हैदराबादचा समावेश आहे. या चार शहरांमधील १७५ रुग्णांची प्राथमिक चाचणीसाठी करण्यात आली आहे. सेंट्रल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियाने (सीटीआरआय) रुग्णांची निवड केल्यासंदर्भातील माहिती दिलीय. या चाचणीसंदर्भातील काही तांत्रिक बाबींसंदर्भातील परवानगी मिळालेली नाही. यासंदर्भातील पूर्तता या आठवड्यापर्यंत केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सध्या भारत सरकारने करोना लसीकरण मोहिमेसाठी सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. मात्र या दोन्ही लसी इंटरामस्कुलर म्हणजेच पेशींमध्ये दिल्या जाणाऱ्या लसी आहेत. त्यापेक्षा ही नाकावाटे देण्यात येणारी लस पूर्णपणे वेगळी असल्याचा दावा केला जातोय. तसेच या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे लसीकरण आणखीन स्वस्त होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय.

भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एल्ला यांनी यापूर्वीच कंपनी नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीसंदर्भात काम करत असल्याचे जाहीर केलं होतं. सध्याच्या लसीकरणामध्ये लसीचे दोन डोस घ्यावे लागत आहेत. त्यामुळेच लसीच्या कुप्या, इंजेक्शन, सुया असा मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा निर्माण होत आहे. त्यावरच तोडगा म्हणून नाकावाटे लस देण्यासंदर्भातील संशोधन सुरु असल्याचे कृष्णा यांनी म्हटलं होतं. या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीच्या मदतीने लसीकरण आणखीन सोप्प्या पद्धतीने करता येणार आहे. या लसीमुळे लसीच्या कुप्या, इंजेक्शन, सुया यांचा खर्च वाचवणार असल्याने लसीकरण आणखीन स्वस्त होऊन त्याचा फायदा सर्वसामान्यांना होईल असं मतही कृष्णा यांनी व्यक्त केलेलं.

आणखी वाचा- “करोनाविरुद्धच्या लढाईत भारत जागतिक स्तरावर नेतृत्व करतोय”; मोदी सरकारच्या मदतीची UN कडून दखल

या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीसाठी भारत बायोटेक आणि सेंट लुईच्या वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये परवान्यासंदर्भातील करार झाल्याची गोष्ट सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेली. त्यामुळेच भारत बायोटेकला या लसीच्या वितरणाचे अधिकार मिळाले आहेत. मात्र प्राथमिक टप्प्यामध्ये कंपनी अमेरिका, जपान आणि यूरोपीयन बाजारपेठांमध्ये ही लस विकू शकत नाही अशी माहिती समोर येत आहे.