पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींचा वाढदिवस असल्याने या निमित्त देशभरता सेवा आणि स्वच्छता कार्यक्रम होणार आहेत. यासाठी १४ ते २० सप्टेंबर पर्यंत ‘सेवा सप्ताह’ राबवला जाणार आहे.

या विशेष कार्यक्रमाची जबाबदारी अविनाश राय खन्ना, केंद्रीयमंत्री अर्जुन राम मेघावल, राष्ट्रीय सचिव सुधा यादव आणि सुनील देवधर यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. या सप्ताह काळात रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, नेत्र तपासणी व उपचार शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहेत. याशिवाय रूग्णालय, अनाथआश्रमात जाऊन भाजपाचे कार्यकर्ते रूग्ण तसेच गरजवंतांची मदत करणार असल्याचीही माहिती आहे.

याचबरोबर भाजपा नेत्यांकडून काही मोठ्या संस्था व दानशूरांना १० ते १०० दिव्यांगांच्या शिक्षणाचा व पालन पोषणाचा खर्च उचलण्याचेही आव्हान केले जाणार आहे. तसेच, पंतप्रधान मोदींच्या जीवनाची व त्यांच्या कार्याची माहिती देणारी पुस्तकं देखील केंद्रीय कार्यालयांमधुन प्रत्येक राज्यांकडे पाठवण्यात आलेली आहेत. राज्यातील भाजपाचे नेते ही पुस्तकं समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रमुख लोकांची भेट घेऊन त्यांना देणार आहेत.

पक्षाचे खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, नेते व कार्यकर्त्यांपर्यंत महानगरापासून ते खेडेगावापर्यंत प्रत्येकजण आपल्या परिसरातील शाळा, महाविद्यालयात जाऊन पुर्नरवापर न होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर बंद करण्यासाठी व पाणी बचतीसाठी मोहीम राबणार आहेत.