वॉलमार्ट या रिटेल क्षेत्रातील कंपनीने भ्रष्टाचारी मार्गांचा अवलंब केल्याच्या प्रकरणी सुरू करण्यात आलेल्या जागतिक चौकशीचा भाग म्हणून भारती वॉलमार्टने मुख्य वित्त अधिकारी पंकज मदान यांच्यासह पाच जणांना निलंबित केले आहे, असे सूत्रांनी सांगितले. या कारवाईत आणखी काही जणांना काढून टाकले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत भारतात नवीन स्टोअर्स सुरू करण्यावर तूर्त मनाई करण्यात आली आहे. भारती वॉलमार्टच्या प्रवक्तयाने सांगितले की,आम्ही या प्रकरणी सखोल व पूर्ण चौकशी करणार आहोत. चौकशीचे काम संपेपर्यंत आम्ही याबाबत जास्त काही सांगू शकत नाही. मदान व इतर पाच सदस्यांच्या चमूपैकी चार जणांना मंगळवारी निलंबित करण्यात आले आहे. भारतासह इतरही काही देशात वॉलमार्टने भ्रष्टाचारी मार्गांचा अवलंब केला असल्याचे प्रकरण नुकतेच उघड झाले आहे. आम्ही भारतात विस्तार करणार आहोत पण चौकशी पूर्ण झाल्याशिवाय वॉलमार्टची कोणतीही नवीन स्टोअर्स सुरू करण्यात येणार नाहीत. भारती समूह व वॉलमार्ट स्टोअर्स यांच्यात सध्या 50-50 टक्के भागीदारी आहे. वॉलमार्टने गेल्या आठवडय़ात असे म्हटले होते की, अमेरिकेतील परदेशी भ्रष्टाचारी पद्धती प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याच्या बाबी सामोऱया आल्या असून परदेशातील सरकारी अधिकाऱयांना लाच दिली गेली आहे. त्यात भारत, चीन व ब्राझील या देशातील अधिकाऱयांचे हात ओले करण्यात आल्याचे समजते. भारतीय बाजारपेठेशी आम्ही एकनिष्ठ आहोत व तेथील व्यापार संधी मोठय़ाच आहेत. आम्ही शेतकऱयांना फायदा करून देऊ, शिवाय भारतातील लोकांच्या राहणीमानाचा खर्च कमी करण्यास मदत करू.