इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा सहसंस्थापक आणि कुख्यात यासिन भटकळ व त्याचा साथीदार असदुल्ला अख्तर यांना शुक्रवारी दिल्लीतील न्यायालयाने १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या दोघांनाही शुक्रवारी दुपारी विशेष विमानाने पाटण्याहून दिल्लीला आणण्यात आले.
दोन्ही दहशतवादी आणि एनआयएचे अधिकारी यांना घेऊन विशेष विमानाने शुक्रवारी दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी पाटण्यामधील जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिल्लीकडे प्रयाण केले. या दोघांनाही कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत शुक्रवारी सकाळी पाटण्यातील विमानतळावर आणण्यात आले. त्यांना विमानतळावर आणल्यावर काही लोकांनी त्यांच्याविरोधात घोषणा देत त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली.
दिल्लीत आणल्यावर दोघांनाही पतियाळा हाऊसमधील न्यायालयात हजर करण्यात आले. भटकळ आणि अख्तर या दोघांकडून वेगवेगळ्या बॉम्बस्फोटांची आणि त्याच्या कटाची माहिती घ्यायची असल्याने त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी एनआयएने केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासह देशभरात ४० बॉम्बस्फोट घडवणारा आणि दहशतवादी हल्ल्यांची योजनाबद्ध आखणी करून त्यांची अंमलबजावणी केल्यामुळे देशातील सुरक्षा यंत्रणा गेल्या पाच वर्षांपासून यासिनचा शोध घेत होत्या. भारत-नेपाळ सीमेवर बुधवारी रात्री गुप्तचर यंत्रणा व बिहार पोलीस यांच्या संयुक्त पथकाने यासिन व त्याचा साथीदार असदुल्ला अख्तर यांना अटक केली. पुण्यासह मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, हैदराबाद व दिल्ली या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणत शेकडोंच्या मृत्यूला यासिन भटकळ कारणीभूत आहे.