स्थानिक व्यापारी व केंद्र सरकारकडून कापसाला मिळणारा प्रतिक्विंटल साडेचार हजार रुपये भाव पुरेसा नसल्याने विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने कापसाला सात हजार रुपये भाव देण्याची मागणी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत केली.
शून्य प्रहरात त्या म्हणाल्या की, कापूस खरेदीसाठी राज्य व केंद्राकडून राज्यात केंद्र उभारण्यात येतात. यंदा केंद्रांची संख्या घटली आहे.  त्यामुळे ‘भारतीय कापूस निगम’च्या भावावर शेतकऱ्यांना विसंबून राहावे लागते. त्यांच्याकडून मिळणारा भाव अत्यल्प आहे. परिणामी अनेक शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडतात. अशा परिस्थितीत केंद्र सकारने शेतकऱ्यांना न्याय द्यावा. राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र वा कागदपत्र जमा करण्यासाठी केंद्र उभारण्याची मागणी केली. शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी मराठवाडय़ाच्या विकासासाठी औरंगाबादमध्ये आयआयएम सुरू करण्याची विनंती सरकारला केली. गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्र सरकारला यासंबंधी पत्र लिहिले असून त्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याची खंत खैरे यांनी या वेळी व्यक्त केली. पालघरच्या चिंतामण वनगा यांनी वडोदरा मुंबई द्रूतगती महामार्ग सुरू न करता सांकरी महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याची विनंती सरकारला केली.    
बनावट इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या मुद्दय़ावर शिरूरच्या शिवाजीराव अढळराव यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
देशातील सर्वात वाईट राष्ट्रीय महामार्ग हिंगोली जिल्ह्य़ात असल्याची खंत व्यक्त करीत काँग्रेसचे राजीव सातव म्हणाले की, कनरेगा, हिंगोली, कन्नूरी, वरंगाला जोडणाऱ्या या महामार्गावर गेल्या वर्षभरात  हजारांपेक्षाही जास्त अपघात झाले आहेत. राज्य सरकारने यापूर्वीच प्रस्ताव पाठवला आहे. या कामी राज्याने केंद्राकडे मागितलेले ७० कोटी रुपये तातडीने देण्याची मागणी सातव यांनी केली.