अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांनी काल आत्महत्या केली होती. इंदूर येथे आपल्या राहत्या घरी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. नुकतेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या पार्थिवावर दुपारी अडीच वाजता इंदूरमधील मेघदूत मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार केले जातील असे सांगण्यात आले होते. मात्र त्यांच्या अंत्यदर्शनासाठी भक्तांनी आणि इतरही लोकांनी मोठी गर्दी केल्याने अंत्यविधीसाठी उशीर झाला. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सूर्योदय आश्रम येथे ठेवण्यात आले होते. यावेळी शेकडो लोकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.

त्यांची मुलगी कुहू त्यांना मुखाग्नी दिला. कुहू आणि भय्युजी महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी यांच्यात संपत्तीवरुन बरेच वाद होते. त्याच्या तणावामुळेच महाराजांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. भय्युजींच्या अंत्यसंस्काराला महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते आणि इतरही अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. आपल्या आत्महत्येसाठी कोणालाही कारणीभूत धरु नये. असे भय्युजी महाराजांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवले होते. त्याबरोबरच काही वेळापूर्वी समोर आलेल्या वृत्तानुसार, आपल्या संपत्तीचे सगळे व्यवहार आपला सेवक विनायक याने पहावेत असेही त्यांनी आपल्या पॉकेट डायरीत लिहून ठेवले होते.

देशभरातील विविध राज्यांमधील राजकीय नेते व चित्रपट अभिनेते भय्यू महाराज यांचे अनुयायी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख व माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील हे त्यांच्याकडे चर्चेसाठी जात असत. भय्युजी महाराज यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी मोठे काम केले. मराठवाड्यात त्यांच्या संस्थेने ५०० तलाव खोदले आहेत. वृक्षारोपण चळवळीला त्यांनी मोठी चालना दिली. लोकांकडून ते काहीही भेटवस्तू स्वीकारत नसत. त्याऐवजी एक झाड लावा, असे ते सांगत.