आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी कौटुंबिक कलहाला कंटाळून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असण्याची दाट शक्यता आहे. भय्यूजी महाराज यांच्या निधनानंतर आता कौटुंबिक वाद समोर आले आहेत. भय्यूजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी कुहू हिने भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषीवर गंभीर आरोप केले आहेत. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येसाठी कुहूने डॉ. आयुषीला जबाबदार धरले आहे. आयुषीमुळे आपल्या वडिलांनी आत्महत्या केली असा आरोप तिने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यावर आयुषी शर्मा यांनी कुहूचे आरोप फेटाळून लावले आहेत. सर्व वादासाठी आयुषीने कुहूला जबाबदार धरले आहे. भय्यू महाराज यांच्या पहिल्या पत्नीचे २०१५ मध्ये निधन झाल्यानंतर त्यांनी डॉ. आयुषी शर्मा यांच्याबरोबर दुसरा विवाह केला. खरंतर या विवाहातून कौटुंबिक समाधान मिळवण्याचा भय्यू महाराज यांचा हेतू होता. पण कुहू आणि डॉ. आयुषी शर्मा यांच्यामध्ये अजिबात पटत नव्हते. त्यामुळे भय्यू महाराज चिंतेत असल्याचे समोर आले आहे.

आयुष्यातील ताणतणाव सहन करण्याच्या पलीकडे गेले असल्यामुळे आपण आत्महत्या करत असून आपल्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे भय्यूजी महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. भय्यू महाराजांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचे दुसरे पान आता समोर आले आहे. बुधवारी दुपारी इंदूर पोलिसांनी दुसरे पान प्रसिद्ध केले.

यामध्ये भय्यूजी महाराजांनी त्यांच्या सुर्योदय आश्रमाची जबाबदारी त्यांचा जवळच सहकारी विनायकवर सोपवली आहे. संपत्ती आणि अन्य आर्थिक व्यवहारा संबंधीचे निर्णय घेण्याचा सर्वाधिकार मी विनायककडे सोपवतो. विनायकवर माझा पूर्ण विश्वास आहे असे भय्यू महाराजांनी या नोटमध्ये म्हटले आहे. कोणीतरी माझ्या कुटुंबाची काळजी घ्यावी. आयुष्यातील ताणतणावांनी मी व्यथित झालो आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाच जबाबदार धरू नये, असे त्यांनी आपल्या सुसाईड नोटच्या पहिल्या पानावर म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhayyuji maharaj suicide at indore ashram ayushi sharma kuhu
First published on: 13-06-2018 at 19:44 IST