अध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांनी मंगळवारी इंदूरमध्ये आपल्या राहत्या घरी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. त्यानंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आपण तणावातून आत्महत्या केली असून त्यासाठी कोणालाही दोषी धरु नये असे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे त्यांना कोणते ताण-तणाव होते, त्यांच्या कुटुंबात काय कलह होते असे प्रश्न समोर आले आहेत. त्यानंतर नुकतीच आणखी एक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, आपले सगळे आर्थिक व्यवहार आपला सेवक विनायककडे द्यावेत अशी इच्छा भय्यू महाराज यांनी व्यक्त केली आहे. भय्यू महाराज यांनी आपल्या पॉकेट डायरीत ही नोंद केली आहे.

विनायक हा भय्युजी महाराज यांच्या अतिशय जवळचा सेवक होता. मागील १५ ते १६ वर्षापासून तो त्यांच्यासोबत होता. त्यांची अनेक कामे करणे तसेच त्यांची काळजी घेण्याचे काम तो करत होता त्यामुळे महाराजांचा त्याच्यावर विश्वास होता. मात्र आपल्या कुटुंबातील व्यक्तींना डावलून महाराजांनी आर्थिक व्यवहार सेवकाकडे द्यावेत अशी इच्छा व्यक्त केल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. येत्या काळात आणखीही काही गोष्टी समोर येण्याची शक्यता असून त्यामार्फत त्यांच्या आत्महत्येचे कारण समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. कौटुंबिक वाद आणि तणाव हे त्यांच्या आत्महत्येमागील कारण असावे असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, आज सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत सुर्योदय आश्रम येथे भय्यू महाराज यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता येईल. दुपारी दीड वाजता अंतिम यात्रेला सुरुवात होणार आहे. दुपारी अडीच वाजता इंदूरमधील मेघदूत मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार केले जातील असे सांगण्यात आले आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ‘कोणीतरी कुटुंबाची जबाबदारी स्वीकारा. मी आता खचलोय. मी आता जात आहे’, असे त्यांनी नोटपॅडमध्ये लिहून ठेवले होते. माझ्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असेही त्यांनी यात नमूद केले होते.