जातीय हिंसाचाराप्रकरणी तुरुंगात असलेला भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद याची शुक्रवारी सुटका करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीत दलितच भाजपाचा पराभव करतील, अशी प्रतिक्रिया देत चंद्रशेखर आझादने भाजपावर टीकेची झोड उठवली.

गेल्या वर्षी जूनमध्ये हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझादला अटक करण्यात आली होती. ५ मे रोजी झालेल्या जातीय हिंसाचारात सामील असल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्या हिंसाचारात सहारणपूरमधील शब्बीरपूर येथे ४ ठार व १६ जण जखमी झाले होते. चंद्रशेखर याच्या आईचे निवेदन मिळाले असून त्याला लवकर सोडण्यात येईल, असे उत्तर प्रदेशच्या गृहखात्याने म्हटले होते.

आझाद याची शुक्रवारी पहाटे २.४० वाजता तुरुंगातून सुटका करण्यात आली त्यावेळी निळ्या टोप्या घातलेले भीम आर्मीचे समर्थक जमले होते. त्यांनी तुरुंगाबाहेर सुटकेचा विजयोत्सव साजरा केला. अनेकजण त्याच्या निवासस्थानी जमले व त्यांनी मिठाई वाटली. भीम आर्मी सरकारच्या दबावापुढे झुकणार नाही. भाजपला पुढील निवडणुकीत सत्तेबाहेर काढण्यासाठी घटनात्मक मार्गाने प्रयत्न केले जातील असे आझाद याने सांगितले. तुरुंगात असताना मी दलितांवरील अत्याचारांविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला. २०१९ मधील निवडणुकीत मी भाजपाचा हिशेब चुकता करेन, दलित समाज भाजपाला चोख प्रत्युत्तर देणार, असेही त्याने सांगितले.