भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना आरक्षणाच्या मुद्द्यावर खुल्या चर्चेचे आव्हान केले आहे. या चर्चेमधून जाती व्यवस्था संपवण्यासंदर्भात संवाद होणे गरजेचे असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे.

अनुसूचित जातीमधील ५४ टक्के जनतेकडे स्वत:च्या मालकीची जमीन नाहीय. तसेच एका विशिष्ट जातीचे देशामध्ये वर्चस्व असल्याचे आझाद यांनी म्हटले आहे. “आरक्षणाच्या विरोधात असणाऱ्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये चर्चा झाली पाहिजे असं त्यांना (भागवत) वाटतं. मी त्यांना प्रसारमाध्यमे आणि इतर संबंधित पक्षांच्या समोर त्यांच्याबरोबर या मुद्द्यावर चर्चा करण्याचे खुले आव्हान देतो. जाति व्यवस्थेमुळे आम्हाला जे काही सहन करावं लागतं ते आम्हाला लोकांसमोर मांडायचे आहे. त्यांनी (भागवत यांनी) आकडेवारीसंदर्भात माहिती काढून या चर्चेला आलं पाहिजे,” असं मत आझाद यांनी व्यक्त केलं आहे. “स्वातंत्र्य मिळाल्यावर ७२ वर्षांनंतरही ५४ टक्के दलितांकडे स्वत:च्या मालकिची जमीन नाहीय. आरक्षण व्यवस्थेबद्दल चर्चाचा मुद्दा मांडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली दलितविरोधी मानसिकता दाखवून दिली आहे,” अशी टिका आझाद यांनी केली आहे.

नक्की वाचा >> आरक्षणावर चर्चा व्हायला हवी: मोहन भागवत

जाती व्यवस्था संपवण्याचे समर्थन

“भागवत यांनी जाती व्यवस्था संपवण्याचा मुद्दा मांडला असता तर भीम आर्मीने त्यांचं समर्थन केलं असतं. जाती व्यवस्थेने देशाला पोखरुन ठेवले आहे. भागवत यांनी यावर चर्चा करायला हवी,” असं मत आझाद यांनी व्यक्त केले आहे. सरकारने आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केला तर लोकं रस्त्यावर उतरतील असं आझाद यांनी सांगितलं.

नक्की वाचा >> भाजपा सरकारमध्ये RSS आहे पण आणि नाही पण ..

कलम ३७० रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयावर अप्रत्यक्षरित्या टिका करत ‘या वेळी आम्ही (आरक्षण रद्द करण्याचा) निर्णय घेतल्यानंतर चर्चा करणार नाही. यावेळी आम्ही या विषयावर सरकार काहीही करण्याआधीच रस्त्यावर उतरू,’ असे सांगितले आहे.

नक्की वाचा >> सत्ता आल्यास मोहन भागवतांना तुरुंगात टाकू : प्रकाश आंबेडकर

 

काय म्हणाले होते भागवत

काही दिवसांपूर्वी भागवत यांनी दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना आरक्षणासंदर्भात चर्चा होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. ‘आरक्षणाचे समर्थन करणारे आणि आरक्षणाचा विरोध करणाऱ्यांदरम्यान सुसंवाद व्हायला हवा. आरक्षणाच्या बाजूने बोलणाऱ्यांनी आरक्षणाला विरोध असणाऱ्यांची भूमिका लक्षात घेऊन आपली मते मांडायला हवीत. तसेच विरोध करणाऱ्यांनाही समर्थन करणाऱ्यांची बाजू ऐकायला हवी’ असं भागवत म्हणाले. “आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलल्यावर दरवेळी अनेकांच्या टोकच्या प्रतिक्रिया उमटतात. मात्र या विषयावर समाजातील वेगवेगळ्या स्तरातील लोकांचे काय विचार आहेत याबद्दल सुसंवाद व्हायला हवा,” असंही भागवत म्हणाले होते.