मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये प्रियकराने त्याच्या प्रेयसीची हत्या करुन तिचा मृतदेह घरामध्येच पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी तरुणीचा मृतदेह ताब्यात घेत तरुणाला अटक केली आहे. पश्चिम बंगालच्या बकोरात राहणाऱ्या श्वेता शर्माची (वय २८ वर्षे) भोपाळच्या उदयन दाससोबत फेसबुकवर मैत्री झाली. यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर नोकरीसाठी जात असल्याचे सांगून श्वेता जून २०१६ मध्ये भोपाळ आली आणि साकेत नगरमध्ये उदयन सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डिसेंबरपर्यंत श्वेता तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होती. यानंतर श्वेताच्या कुटुंबीयांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बकोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर बकोरा पोलिसांनी श्वेताचे मोबाईल लोकेशन तपासले. यातून श्वेताचा मोबाईल भोपाळच्या साकेत नगर परिसरात असल्याचे समोर आले. यानंतर गुरुवारी संध्याकाळी पोलीस भोपाळला पोहोचले.

‘बकोरा येथील बँक अधिकारी शिवेंद्र शर्मा यांची मुलगी श्वेताच्या मोबाईलचे लोकेशन साकेत नगरमधील एका घरात असल्याचे आढळून आले. यानंतर बकोरा पोलिसांनी भोपाळ पोलिसांच्या मदतीने श्वेता उदयनसोबत त्याच घरात राहत असल्याची माहिती मिळवली,’ असे गोविंदपुरा भागाचे पोलीस अधीक्षक विरेंद्र मिश्रा यांनी सांगितले. ‘उदयनने श्वेता त्याच्यासोबत राहात असल्याची माहिती दिली. काही वाद झाल्याने उदयनने गळा दाबून श्वेताची हत्या केली. यानंतर उदयनने श्वेताचा मृतदेह घरात सिमेंट काँक्रिटचा चबुतरा तयार करुन त्यात पुरला,’ अशी माहिती मिश्रा यांनी दिली आहे. पोलिसांनी सिमेंट काँक्रिटचा चबुतरा तोडून श्वेताचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. यासोबतच आरोपी उदयनला अटक करुन त्याच्या चौकशीला सुरुवात केली आहे. मात्र उदयन श्वेताच्या हत्येची व्यवस्थित माहिती देत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

उदयनने श्वेतासोबत डिसेंबरमध्ये वाद झाल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. ‘डिसेंबरच्या अखेरीस श्वेतासोबत वारंवार वाद होत होते. त्यामुळे संताप अनावर झाल्याने श्वेताची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर श्वेताचा मृतदेह बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्य उघडकीस येईल, या विचाराने घरातच चबुतरा तयार करुन श्वेताचा मृतदेह पुरला,’ असे उदयनने पोलिसांना सांगितले आहे.

काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, उदयन वारंवार आपला जबाब बदलतो आहे. ‘आम्ही पळून जाऊन न्यूयॉर्कमध्ये विवाह केला. माझी आईदेखील अमेरिकेत राहते,’ असे उदयनने पोलिसांना सांगितले. मात्र आई अमेरिकेवरुन परत केव्हा येणार, याची माहिती उदयनने दिलेली नाही.