मुंबईत पावसाचे पाणी तुंबते, मुंबईकरांचे हाल होतात तेव्हा महापौरांनी रस्त्यावर उतरून किंवा पुराच्या पाण्यात उतरून परिस्थितीचा आढावा घेतल्याचे ऐकिवात नाही. मात्र भोपाळचे महापौर आलोक शर्मा यांनी पुराच्या पाण्यात खुर्ची टाकली आणि कोणकोणत्या भागात पाणी साठले आहे याचा आढावा पुराच्या पाण्यातच बसून घेतला. एवढेच नाही तर मी आता जिल्हाधिकाऱ्यांनाही येथे बोलावले आहे आणि पुन्हा अशी स्थिती उद्भवू नये म्हणून काय करता येईल याचा विचार आम्ही करतो आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

भोपाळचे महापौर आलोक शर्मा यांचे फोटोच एएनएआयने ट्विट केले आहेत. अतिवृष्टीमुळे भोपाळमध्येही पुराचे पाणी साठले आहे. त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो आहे. अशात भोपाळमध्ये महापौरांनी रस्त्यावर उतरून स्वतः लोकांना काय त्रास होतो याचा आढावा घेतला आहे. लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून आम्ही या परिस्थितीतून धडा घेण्याचा प्रयत्न करतो आहे, असेही शर्मा यांनी म्हटले आहे.

भोपाळमध्ये महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. आपल्या कार्यातून, जबाबदारी घेण्याच्या वृत्तीतून आलोक शर्मा यांनी एक आदर्श उदाहरण ठेवले आहे. मुंबईत अनेक पावसामुळे रस्त्यावर पाणी साठते, सखल भागातून जीव मुठीत घेऊन जावे लागते अशा सगळ्या परिस्थितीचा सामना मुंबईकरांना करावा लागतो. मात्र या समस्या दूर व्हाव्यात म्हणून मुंबईचे महापौर अशा प्रकारे रस्त्यावर उतरल्याचे ऐकिवात नाही निदान या उदाहरणातून तरी आदर्श घेत मुंबईचे महापौर मुंबईकरांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करतील अशी आशा मुंबईकरांना आहे.