रस्ते, वीज आणि पाणी या मुद्द्यांवर निवडणूक लढणारी काँग्रेस मध्य प्रदेशमध्ये पुन्हा सत्तेत आली. मात्र राज्यात काँग्रेस सत्तेमध्ये आल्यापासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी तर भारनियमनाची हद्दच झाली. राज्याचे ऊर्जामंत्री प्रियव्रत सिंह यांची पत्रकार परिषद सुरु असतानाचा वीज गेली. राज्याची राजधानी असणाऱ्या भोपाळमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वीज गेल्याने काँग्रेसवर नामुष्की ओढावली.

ऊर्जामंत्री भोपाळमधील पत्रकार परिषदेमध्ये ऊर्जा मंत्रालयाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती देणार होता. राज्यातील काँग्रेस सरकारने इंदिरा गृहज्योती योजनेअंतर्गत राज्यातील एक कोटींहून अधिक ग्राहकांच्या हिताचे निर्णय घेतल्याचे सिंह सांगत असतानाच अचानक वीज गेली. पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेल्या हॉलमध्ये अंधार पसरला. थोडावेळ कोणीच काही बोलत नव्हते. मंत्री मोहद्यांना काय बोलावे समजत नव्हते तर अधिकाऱ्यांनाही काही कळत नव्हते. दोन मिनिटांनी पुन्हा वीजपुरवठा सुरळीत झाला. मात्र या दोन मिनिटांमध्ये ऊर्जामंत्र्यांच्या चेहऱ्यावरील निराशा स्पष्टपणे दिसत होती. वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर सिंह पुन्हा बोलू लागले पण त्यांच्या बोलण्यातील हुरुप हरवलेला जाणवत होतं. अखेर त्यांनी या प्रकरणाचे खापर विरोधकांवर फोडले. ‘काँग्रेस सरकारच्या मंत्र्यांचे कार्यक्रम तसेच पत्रकार परिषदेमध्ये वीजपुरवठा खंडीत करण्यामागे विरोधकांचा हात आहे. हा कटाचा एक भाग आहे. हे असं करणाऱ्यांना शोधून सरकार त्यांच्यावर कारवाई करणार आहे,’ असं सिंह यांनी सांगितले.

ऊर्जामंत्र्यांच्याच पत्रकार परिषदेमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर भाजपाने सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला. राज्येचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटवरुन या प्रकरणावर टिका केली. ‘ही आहे मध्य प्रदेशची सध्याची परिस्थिती आणि ही आहे ऊर्जामंत्र्यांची पत्रकार परिषद. हेच लोक राज्यातील भारनियमन कमी करु असं सांगत होते,’ असा टोला चौहान यांनी लगावला.

आता या प्रकरणामध्ये ऊर्जामंत्री खरोखरच कारवाई करणार का हे येणारा काळच सांगेल.