भोपाळ खासगी वसतिगृह बलात्कार प्रकरणात आणखी एक महिला समोर आली असून तिने संचालकावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. वसतिगृहाच्या संचालकाने मला बंधन बनवून ठेवले व सलग सहा महिने आपल्यावर बलात्कार केला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. भोपाळ वसतिगृह बलात्कार प्रकरणात समोर आलेली ही चौथी महिला आहे.

मागच्या आठवडयात एका २० वर्षीय मूकबधिर मुलीने वसतिगृहाच्या संचालकाविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. वसतिगृहाचा संचालक अश्विनी शर्माला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. त्याच्यावर बलात्कार, दहशत निर्माण करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अश्विनी शर्माने मला बंधक बनवून ठेवले होते. मला पॉर्न फिल्मस पाहण्यासाठी भाग पाडले जायचे. त्यानंतर माझ्यावर बलात्कार केला जायचा असे पीडित महिलेने इंदूर पोलिसांना सांगितले. जेव्हा मी मागण्या मान्य करण्यास नकार दिला तेव्हा मला अत्यंत क्रूर पद्धतीने मारहाण करण्यात आली असे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले. धार जिल्ह्यात राहणाऱ्या या २३ वर्षीय महिलेला अश्विनी शर्माने अवधपुरी येथील स्वतंत्र घरात ठेवले होते. तिच्यासोबत आणखी चार जणी तिथे होत्या.

या प्रकरणावरुन मध्य प्रदेशात आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला आहे. काँग्रेसने अश्विनी शर्माची बिहारमधील बलात्काराचा आरोपी ब्रजेश ठाकूरबरोबर तुलना केली आहे. अश्विनी शर्मा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी संबंधित असून त्याला मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचा आशिर्वाद मिळाला आहे असा आरोप राज्य काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनी केला. भाजपाचे प्रवक्ते राहुल कोठारी यांनी हा आरोप फेटाळून लावताना काँग्रेस या संवेदनशील प्रकरणात राजकारण खेळत असल्याचा आरोप केला. आरोपीला अटक झाली असून तपास सुरु झाला आहे असे त्यांनी सांगितले.