बनारस हिंदू विद्यापीठाने (बीएचयू) नव्या कुलगुरूंचा शोध सुरू केला आहे. शनिवारीच या विद्यापीठाने त्यांच्या वेबसाईटवर ‘कुलगुरू हवेत’ अशी जाहिरातच दिली आहे. या जाहिरातीमुळे सध्याचे कुलगुरू गिरीश चंद्र त्रिपाठी यांची गच्छंती अटळ आहे हे स्पष्ट झाले आहे. २७ नोव्हेंबरला त्रिपाठींचा कार्यकाळ संपतो आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने (एचआरडी) हा कार्यकाळ न वाढवता नव्या कुलगुरूंसाठी जाहिरात दिली आहे. ‘नवभारत टाइम्स’ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच एका विद्यार्थिनीसोबत छेडछाड झाल्याप्रकरणी बीएचयूमध्ये विद्यार्थिनींचे मोठे आंदोलन उसळले होते. तसेच या आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते. तसेच या विद्यापीठातील इतर प्रश्नही प्रलंबित आहेत. त्याचमुळे गिरीश चंद्र त्रिपाठी यांचा कार्यकाळ वाढवून दिला जात नसल्याची चर्चा आहे.

बनारस हिंदू विद्यापीठ अर्थात बीएचयूमध्ये मागील आठवड्यात विद्यार्थिनींची छेडछाड करण्यात आली. त्यानंतर आंदोलन करण्यात आले. मागील रविवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलक विद्यार्थिनींना पांगवण्यासाठी पोलिसांनी  लाठीमार केला. ज्यामध्ये एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. पोलिसांनी आंदोलन पांगवण्यासाठी बळाचा वापर केल्याने बीएचयूचे विद्यार्थी आणखी आक्रमक झाले आणि त्यांनी जाळपोळ आणि दगडफेक केली. या सगळ्या प्रकरणामध्ये बीएचयूने पुरेसे लक्ष दिले नाही असाही ठपका ठेवण्यात आला आहे. आता याच विद्यापीठासाठी नवे कुलगुरू शोधण्यासाठी जाहिरात देण्यात आली आहे.