उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या निलंबित विद्यार्थ्याची कॅम्पसमध्येच गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. गौरव सिंह असं या विद्यार्थ्याचं नाव असून दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. उपचारादरम्यान गौरव सिंहचा मृत्यू झाला. याप्रकरणी विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय विद्यापीठाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचंही नावही तक्रारीत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवरुन झालेल्या आंदोलनादरम्यान करण्यात आलेल्या हिंसाचारात सहभागी असल्याने 23 वर्षीय गौरव सिंहचं विद्यापीठ प्रशासनाकडून निलंबन करण्यात आलं होतं. आंदोलनादरम्यान बस जाळण्यात आली होती, ज्यामध्ये गौरव सिंह सहभागी होता. गौरव सिंह विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत होता.

गौरव सिंह विद्यापीठापासून जवळच असणाऱ्या हॉस्टेल कॅम्पसमध्ये मित्रांशी गप्पा मारत उभा होता. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळीबार करत पळ काढला. गौरव याला रात्री ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर प्रकृती खराब झाल्याने त्याला आयसीयूत हलवण्यात आलं होतं. पण अखेर त्याचा मृत्यू झाला.

गौरव सिंह याच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर त्याचे मित्र मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. यावेळी सुरक्षारक्षकांसोबत त्यांची बाचाबाचीदेखील झाली. निदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

‘गौरव सिंह याच्यावर चौघांनी मिळून एकूण दहा गोळ्या झाडल्या. एफआयर दाखल होताच आम्ही चार विद्यार्थ्यांना अटक केली आहे. ही हत्या वैयक्तिक भांडणातून करण्यात आली असल्याची शक्यता आहे. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत’, अशी माहिती वाराणसीचे पोलीस आयुक्त आनंद कुलकर्णी यांनी दिली आहे.