आसाममध्ये नागरिकत्व विधेयकाचा वाद दिवसेंदिवस चिघळत आहे. आता नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात दिवंगत ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांच्या कुटुंबियांनी ‘भारतरत्न’ पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं त्यांचा मुलगा तेज हजारिका यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने भूपेन हजारिका यांना प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच २५ जानेवारी रोजी भारतरत्न जाहीर केला होता.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या तेज हजारिका यांनी आसामच्या स्थानिक वाहिनीसोबत बोलताना हा सन्मान आम्ही स्वीकारणार नाही, असे स्पष्ट केले. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे तेज यांनी नमूद केले.

दुसरीकडे, भूपेन हजारिका यांचे मोठे बंधू समर हजारिका यांनी, ‘भारतरत्न’ पुरस्कार न स्वीकारण्याच्या निर्णयाशी आपण सहमत नसल्याचे म्हटले आहे. ‘भारतरत्न पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय त्यांचा मुलगा तेजचा आहे. मात्र, या निर्णयाशी मी सहमत नाही. भूपेन यांना भारतरत्न मिळण्यास आधीच बराच उशीर झाला आहे’, असं ते म्हणाले.

नागरिकत्व सुधारणा विधेयकाला ईशान्येतील राज्यांचा तीव्र विरोध आहे. तर काही दिवसांपूर्वीच आसामच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकावर काँग्रेस अपप्रचार करत असल्याची टीका केली होती.