पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकांना जवळपास एक वर्ष बाकी असताना विजय रुपाणी यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक पदाचा राजीनामा दिला होता.

५९ वर्षांचे पटेल यांची रविवारी भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली होती. राजभवनात झालेल्या एका साध्य समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना राज्याचे सतरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह हरियाणा, मध्य प्रदेश, गोवा व कर्नाटक या राज्यांचे मुख्यमंत्री अनुक्रमे मनोहरलाल खट्टर, शिवराजसिंह चौहान, प्रमोद सावंत व बसवराज बोम्मई हे यावेळी हजर होते. पटेल यांचे पूर्वसुरी विजय रुपाणी व माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही उपस्थितांमध्ये समावेश होता.

पक्षाने ठरवल्यानुसार केवळ पटेल यांनीच शपथ घेतली. मंत्रिमंडळातील नावांना अंतिम रूप देण्यात आल्यानंतर त्यांचा शपथविधी येत्या काही दिवसांत होईल, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या पटेल यांचे अभिनंदन केले. भाजप संघटनेत असो, किंवा नागरी प्रशासन व सामुदायिक सेवेत असो, त्यांचे अनुकरणीय काम मी पाहिले आहे. ते नक्कीच गुजरातला विकासाच्या मार्गावर नेतील, असे ट्वीट मोदी यांनी केले.

सरकार स्थापन करण्याबाबत नवे भाजप विधिमंडळ पक्षनेते पटेल यांनी दिलेला प्रस्ताव स्वीकारून राज्यपालांनी रविवारी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचे आमंत्रण दिले होते.

 निवडणुकीची तयारी

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका डिसेंबर २०२२ मध्ये होणार असताना, पाटीदार समाजाचे नेते असलेल्या पटेल यांच्यावर भाजपने विजयासाठी भिस्त ठेवली आहे. २०१७ सालच्या निवडणुकीत भाजपने १८२ पैकी ९९ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला ७७ जागा मिळाल्या होत्या.