हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. पंचकुलातील असोसिएट जर्नल्स लिमिटेड (AJL) ला बेकायदेशीरपणे जमीन दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने भूपिंदर हुडा अडचणीत सापडले आहेत.

भूपिंदरसिंह हुडा यांनी पंचकुला येथील सेक्टर ६ मधील ३३६० चौरस मीटरचा भूखंड असोसिएट जर्नल्स लिमिटेडला (Associated Journals Limited) १९८२ मध्ये दिला होता. या भूखंडावर १९२ पर्यंत कोणत्याही बांधकाम करण्यात आले नाही. त्यानंतर हा भूखंड हरियाणा शहर विकास प्राधिकरणाने आपल्या ताब्यात घेतला होता. २००५ मध्ये सर्व कायदे धाब्यावर बसवून भूपिंदरसिंह हुडा अध्यक्ष असलेल्या प्राधिकरणाने हा भूखंड पुन्हा असोसिएट जर्नल्स लिमिटेडला दिला.

असोसिएट जर्नल्स लिमिटेड ही कंपनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची आहे. त्यात गांधी कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे. नॅशनल हेराल्ड हेदेखील याच कंपनीचा एक भाग आहे. हरियाणात मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपची सत्ता आल्यानंतर भूपिंदर हुडा यांच्या चौकशीचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. हा भूखंड बेकायदेशीररित्या ‘एजेएल’ला पुन्हा देण्यात आल्याचे वृत्त डिसेंबर २०१५ मध्ये सर्वात आधी इंडियन एक्स्प्रेसने प्रसिद्ध केले होते. हा भूखंड देताना कायद्याचे उल्लंघन करण्यात आले नाही. या प्रकरणी माझी चौकशी करण्याचे आदेश देऊन भाजप सरकारने ‘राजकीय बदला’ घेतल्याचा आरोप भूपिंदर हुडा यांनी केला आहे.