जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० काढून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या या निर्णयाला ज्येष्ठ काँग्रेस नेते भूपिंदरसिंह हुडा यांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी हुडा यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडत घरचा अहेर दिला आहे. कलम ३७० या मुद्द्यावर काँग्रेस पूर्णपणे भरकटल्याचे वक्तव्य करत भूपिंदरसिंह हुडा यांनी स्वत:च्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. हरियाणामधील रोहतक येथील एका रॅलीत बोलताना हुडा यांनी कलम ३७०वर आपली भूमिका स्पष्ट केली.

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा यांनी काँग्रेस पक्षाला या रॅलीमध्ये खडे बोल सुनावले. ते म्हणाले की, ‘माझा पक्ष पूर्णपणे भरकटला आहे. हा पूर्वीचा काँग्रेस पक्ष राहिलेला नाही. कलम ३७० हटल्यास माझा पाठिंबा होता मात्र, पक्षातील काही नेत्यांचा त्याला विरोध होता. केंद्र सरकारने एखादा योग्य निर्णय घेतला, तर त्याला मी पाठिंबा देण गरजेचे आहे. देशप्रेम आणि आत्मसन्मान याबाबत कधीही तडजोड केली जाणार नाही.’

लवकरच हरियाणामध्ये विधानसभाच्या निवडणुका होणार आहे. त्यापूर्वी भूपिंदरसिंह हुडा यांनी स्वत:च्या पक्षावर केलेल्या टीकेमुळे ते काँग्रेमधून बाहेर पडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. रविवारी घेण्यात आलेल्या रॅलीमध्ये त्यांनी त्यांच्या गटाच्या व्यतिरिक्त कोणत्याही काँग्रेस नेत्याला आमंत्रित केले नव्हते.