धर्म व विज्ञान यांचा संबंध जोडू नये असे म्हणतात पण नेहमीच अनेकांना तो मोह होतो. अलिकडे मुंबईतील सायन्स काँग्रेसमध्ये पुराणकथांमध्ये विमानांची निर्मिती कशी करण्यात आली होती याची ‘विमाने उडवण्यात’ आली, पण असे प्रकार आपल्याच देशात चालतात अशातला भाग नाही तर प्रगत देश म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेतील लुईझियाना प्रांतात ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ असलेले बायबल चक्क विज्ञानाचे क्रमिक पुस्तक म्हणून वापरले जाते, त्याबाबतची माहिती उपलब्ध झाली असून त्याच्या आधारे ‘रॉ स्टोरी’ या संकेतस्थळाने वृत्त दिले आहे.
ख्रिश्चन धर्मात विशेष करून जीवसृष्टीची निर्मिती देवाने केली असे मानले जाते. त्यांच्यातील कट्टर धर्मवाद्यांना उत्क्रांती वगैरे मान्य नाही. हे यापूर्वीही अनेकदा दिसून आले आहे. लुईझियाना प्रांतात शिक्षकांना उत्क्रांतीवर चर्चा करण्यास परवानगी आहे, असे लुईझियाना विज्ञान शिक्षण कायद्यात म्हटले आहे पण उत्क्रांतीवरील चर्चा धर्मग्रंथांच्या मदतीने करावी, असे मात्र त्यात म्हटलेले नाही. बोसियर पॅरिश स्कूल येथे विद्यार्थी जीवशास्त्राच्या तासाला उत्क्रांतीची चर्चा डार्विनच्या पुस्तकांच्या आधारे करीत नाहीत तर ‘बुक ऑफ जेनेसिस’ या धार्मिक पुस्तकाच्या माध्यमातून करतात, असे स्लेट या संकेतस्थळांना मिळालेल्या इमेल्समध्ये म्हटले आहे.
बुक ऑफ जेनेसिस म्हणजे हिब्रूतील बायबल आहे. एअरलाइन स्कूल येथील विज्ञान शिक्षिका शॉना क्रिमर यांनी त्यांच्या प्राचार्य जॅसन रोलँड यांना इमेलद्वारे कळवले आहे, की आम्ही मूळ पुस्तक म्हणून वर्गात बायबल वाचतो व नंतर उत्क्रांतीच्या सिद्धांतातील उणिवा काढत बसतो, नंतर विद्यार्थ्यांनाही तसेच सादरीकरण करायला लावतो. कॅडो पॅरिश स्कूल येथील पाचवीच्या शिक्षिका शार्लट हिन्सन यांनी सांगितले, की आम्ही निर्मितीवाद व उत्क्रांतिवाद दोन्ही शिकवतो पण विज्ञान देवाने निर्माण केले असे सांगतो.
एका पालकाने प्राचार्याकडे याबाबत तक्रार केली त्यात म्हटले आहे, की सिंडी टॉलिव्हर या शिक्षिका त्यांच्या वर्गात धार्मिक शिक्षण देतात. एका पालकाने मायकेल स्टॅसी या शिक्षकास शाबासकी दिली असून ते पूर्ण विचारांती उत्क्रांतिवाद व निर्मितीवाद शिकवतात. राज्याच्या २००८ मध्ये संमत करण्यात आलेल्या कायद्यानुसार विज्ञान शिक्षकांना निर्मितीवादाबाबत कथित वैज्ञानिक सिद्धांत खोडून काढणारे पूरक साहित्य वापरण्यास परवानगी आहे पण तेथे प्रत्यक्षात वेगळेच धार्मिक शिक्षण दिले जात आहेत. प्रार्थना सुद्धा बेकायदा असताना ती घेतली जाते.
 बोसियर शाळेचे म्हणणे असे, की आमच्याकडे काही प्रश्न आहेत पण ख्रिश्चनांमध्येही हे सगळे मानणारे लोक आहेत. कॅरोलिन गुडविन या शिक्षिकेच्या मते वर्गात प्रार्थना करून आम्ही नेहमी कायदा मोडत आलो आहोत. २०१० मध्ये शिक्षण कायद्यातील धर्मविरोधी तरतुदी काढून टाकण्याचा प्रयत्न पाचव्यांदा अपयशी ठरला होता.

‘विज्ञान देवाने निर्माण केले..’
धर्म व विज्ञान, धर्म व राजकारण यांचा संबंध जोडल्याने अनेक अनर्थ ओढवतात जसे आपण मदरशांमधील धार्मिक शिक्षणाला विरोध करतो तसेच प्रकार प्रगत देशांमध्येही घडतात. अमेरिकेतील लुईझियाना प्रांतता बायबल हे विज्ञानाचे क्रमिक पुस्तक म्हणून शिकवले जाते व विज्ञान देवाने निर्माण केले जाते असे सांगितले जाते. अनेक पालकांनी त्याबाबत शाळांकडे तक्रारी केल्या आहेत. काही ख्रिश्चन गटांच्या मते जग देवाने निर्माण केले व त्यात उत्क्रांतिवादाचा काही संबंध नाही, हे प्रगत देशांतही चालते, हे विशेष.