अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेल्या बंद गळ्याच्या आणि रेषांमध्ये नाव गुंफलेल्या कोटाची लिलावातील किंमत दीड कोटीच्या जवळपास पोहोचली आहे. लिलावाला अजून एक दिवस शिल्लक असताना बोली बोलणाऱ्यांची चढाओढ कायम राहून आदल्या दिवसापेक्षा २७ लाख रुपये अधिकची बोली हा कोट खरेदी करण्यासाठी लावण्यात आली.
सुरत येथील कपडय़ांचे व्यापारी राजेश जुनेजा यांनी बुधवारी या कोटासाठी १.२१ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावली होती. गुरुवारी सकाळी ‘ग्लोबल मोदी फॅन क्लब’चे राजेश माहेश्वरी यांनी ही बोली १.२५ कोटीवर नेली. येथील हिऱ्यांचे व्यापारी मुकेश पटेल यांनी ही रक्कम वाढवून १.३९ कोटी इतकी केली. यानंतर भावनगरचे जहाजतोडणी उद्योजक व लीला ग्रूपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोमलकांत शर्मा यांनी १.४१ कोटी रुपयाची बोली लावली. चढाओढीचा क्रम कायम राखून मुकेश पटेल यांनी आधी लावलेली बोली नऊ लाखांनी वाढवून ही रक्कम १.४८ कोटीवर नेली.
रेषांमध्ये ‘नरेंद्र दामोदरदास मोदी’ असे नाव लिहिलेला हा बंद गळ्याचा सूट मोदी यांनी बराक ओबामा यांच्या भेटीच्या वेळेस घातला होता. या सुटासह मोदी यांना भेट म्हणून मिळालेल्या ४५६ वस्तूंचा सुरत महापालिका लिलाव करत आहे. या लिलावातून मिळणारी रक्कम मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘गंगा स्वच्छता मोहिमेसाठी’ दिली जाणार आहे.
या लिलावाने साऱ्या देशाचे व प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधून घेतले असतानाच राजकीय विरोधकांनी मात्र त्यावर टीका केली आहे. हा ‘स्वत:ची जाहिरात’ करण्याचा प्रकार असल्याचे सांगून काँग्रेस कार्यकर्त्यांनी लिलाव स्थळाबाहेर निदर्शने केली. तर, या सूटचे वर्णन ‘ऐतिहासिक’ असे करून, तो न विकता पुढील पिढय़ांना पाहण्यासाठी तो संग्रहालयात ठेवला जावा, अशी उपहासात्मक सूचना जद (यू)चे अध्यक्ष शरद यादव यांनी केली.