अमेरिकेत आतापर्यंत कुठल्याही अध्यक्षांपुढे ‘टाळेबंदी करावी की करू नये’ असा अवघड प्रश्न पदार्पणातच सामोरा आला नव्हता पण आता बायडेन यांना त्यावर निर्णय घ्यावा लागणार आहे. पदावर नसताना त्यांनी टाळेबंदीचा पर्याय योग्य ठरवला होता. आता पुन्हा काही काळासाठी अमेरिकेत टाळेबंदी करावी का, केली तर त्याचे काय आर्थिक परिणाम होतील या कोडय़ात ते अडकले आहेत.

डेमोक्रॅटिक पक्षाचे बायडेन हे अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाले असून  निवडणुकीपूर्वी  त्यांनी लोकांना मुखपट्टी वापरण्याचे व सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले होते. आता बायडेन यांनी करोना विषाणू प्रतिबंधासाठी उपाययोजना सुचवण्याकरिता सल्लागार मंडळाची नियुक्ती केली असून त्यातील एक सदस्य मायकेल ओस्टरहोम यांनी देशात चार ते सहा आठवडय़ांची टाळेबंदी करावी व लोकांना रोजीरोटीसाठी मदत द्यावी अशी शिफारस केली आहे. पण नंतर ओस्टरहोम यांनी ही सूचना मागे घेतल्याचेही बोलले जाते. इतर दोन सदस्यांनी सांगितले की, टाळेबंदीचा आम्ही विचारही केलेला नाही. आता बायडेन यांची कसोटी ही करोनाचा प्रतिबंध करण्यात लागणार असून अमेरिकी सार्वजनिक आरोग्य योजनेचा पुरस्कार करणाऱ्या बायडेन यांच्यापुढे पहिले मोठे आव्हान करोनाचेच आहे. कारण थंडीत रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका आहे. अमेरिकेत पुन्हा टाळेबंदी करायची असल्यास बायडेन यांना एकटय़ाने तसे करता येणार नाही त्यासाठी रिपब्लिकन पक्षाचाही पाठिंबा लागणार आहे. राज्ये व स्थानिक अधिकाऱ्यांशीही सल्लामसलत करावी लागेल. हॉपकिन्स सेंटर फॉर हेल्थ सिक्युरिटी या संस्थेचे प्राध्यापक डॉ. अमेश अडाल्जा यांनी सांगितले की, पुन्हा समजा टाळेबंदी केली व  ती लोकांनी पाळली नाही तर टाळेबंदीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महत्त्वच संपुष्टाच येईल. निवडणुकीत पराभव झाल्यापासून प्रथमच शुक्रवारी ट्रम्प यांनी टाळेबंदीला पाठिंबा देणार नाही असे जाहीर केले. आता करोनाचे नवे रुग्ण वाढत असून  गुरुवारची रुग्णवाढ १ लाख ५३ हजार होती. काही राज्यात टाळेबंदी उठवण्यात आली असून प्रतिबंधात्मक उपायांना लोक आधीच कंटाळलेले आहेत.