अमेरिकी अध्यक्षपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीचा निकाल मतदानानंतर दुसऱ्या दिवशीही स्पष्ट झालेला नाही. करोनामुळे वाढलेल्या टपाली मतांची मोजणी सुरूच असून, डेमोकॅट्रिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आघाडीवर आहेत. मात्र, विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मतदान थांबवा’ अशी संघर्षमय भूमिका घेऊन गुंतागुंत वाढवली आहे. अ‍ॅरिझोना, नेवाडा, पेनसिल्वेनिया आणि जॉर्जिया या राज्यांतील निकाल आता निर्णायक ठरणार असल्याने त्यांच्याकडे लक्ष आहे.

बायडेन यांनी २५३ प्रातिनिधिक मते मिळवली असून, ट्रम्प यांच्या पारडय़ात २१३ मते आहेत. अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक २७० प्रातिनिधिक मते दोघांपैकी कुणाही उमेदवाराला अद्याप मिळालेली नाहीत. मात्र, ट्रम्प यांच्या तुलनेत बायडेन यांची विजयाची शक्यता अधिक असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी ट्रम्प यांना जॉर्जिया, पेनसिल्वेनिया, अ‍ॅरिझोना आणि नेवाडा ही चारही राज्ये जिंकावी लागतील. जॉर्जिया व पेनसिल्वेनियामध्ये ट्रम्प आघाडीवर आहेत, तर अ‍ॅरिझोना आणि नेवाडामध्ये बायडेन आघाडीवर आहेत. जॉर्जियामध्ये अद्याप हजारो मतांची मोजणी शिल्लक आहेत. या राज्याची १६ प्रातिनिधिक मते आहेत. पेनसिल्वेनियामधील ७१ टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली असून, एकूण २६ लाख इतक्या मतदानापैकी सुमारे सात लाख मतांची मोजणी बाकी असल्याचे राज्याच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हटले आहे. या राज्यात २० प्रातिनिधिक मते आहेत. अ‍ॅरिझोनामध्ये ११, तर नेवाडामध्ये ६ प्रातिनिधिक मते आहेत. अलास्का आणि नॉर्थ कॅरोलिना या राज्यांमध्येही मतमोजणी सुरू असली, तरी या दोन्ही राज्यांमध्ये ट्रम्प यांच्याकडे मोठी आघाडी आहे.

जॉर्जिया, मिशिगन आणि पेनसिल्वेनिया या राज्यांत टपाली मतांच्या हाताळणीवरून ट्रम्प यांच्या प्रचारकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी विस्कॉन्सिनमध्ये फेरमोजणीची मागणी केली आहे. विस्कॉन्सिनमध्ये ट्रम्प आणि बायडेन यांच्यातील मतांमध्ये फक्त एका टक्क्यापेक्षा कमी फरक असल्याने त्यांनी ही मागणी लावून धरली.

टपाली मतांच्या मोजणीला आणखी किती वेळ लागेल, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे निकाल लांबला असून, ट्रम्प समर्थकांनी आंदोलनांची भूमिका घेतली आहे. अमेरिकी अध्यक्षपदाची अनिश्चितता कधी संपेल, याकडे अमेरिकेसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अध्यक्षीय निवडणुकीप्रमाणेच अमेरिकी संसदेसाठी काही राज्यांमध्ये झालेल्या सिनेट आणि प्रतिनिधिगृहाच्या निवडणुकीतही संमिश्र कौल आढळून येत आहे. सिनेटमध्ये बहुमत राखण्यात रिपब्लिकन पक्ष कदाचित यशस्वी होईल अशी चिन्हे आहेत. तर प्रतिनिधिगृहातील डेमोकॅट्र्सची संख्या घटणार असली, तरी या सभागृहात बहुमत मात्र त्यांचेच राहील, असे दिसते.

  • जो बायडेन – २५३
  • डोनाल्ड ट्रम्प – २१३
  • विजयासाठी – २७०

मतमोजणी सुरू ..

अ‍ॅरिझोना, नेवाडा, पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, अलास्का

जगाचे लक्ष : टपाली मतांच्या मोजणीला विलंब झाल्याने निकाल लांबणीवर गेला आहे. त्यामुळे अमेरिकी अध्यक्षपदाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. ती कधी संपेल आणि नवा अध्यक्ष कोण असेल, याबाबत अमेरिकेसह जगभरात प्रचंड उत्सुकता आहे.

ट्रम्प समर्थकांकडून गोंधळ

विद्यमान अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी टपाली मतांच्या मोजणीत घोटाळा झाल्याचा आरोप करून मोजणी बंद करा, असे ट्विट केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. अनेक ठिकाणी ट्रम्प यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला.

मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर मी विजयी झालेलो असेन. सर्व अमेरिकी जनतेचा अध्यक्ष म्हणून मी पदाला न्याय देईन.

-जो बायडेन, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार

टपाली मतांची मोजणी हा देशातील मोठा घोटाळा आहे. मी आधीच जिंकलो आहे. मतमोजणी बंद करा.

– डोनाल्ड ट्रम्प, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार