वॉशिंग्टन : उच्च कौशल्य असलेल्या कामगारांसाठीच्या एच १ बी व्हिसाची मर्यादा वाढवण्याचा विचार असल्याचे बायडेन प्रशासनाने त्यांच्या निवडणूक कार्यक्रमात जाहीर केले होते, त्या प्रमाणे सत्ताग्रहणानंतर त्यांचे प्रशासन  पावले उचलणार आहे.

हजारो भारतीयांना मिळणाऱ्या एच १ बी व्हिसाचा  कार्यक्रम ट्रम्प प्रशासनाने  रद्द केल्याने माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना व कंपन्यांना फटका बसला होता.  आता एच १ बी व्हिसा कार्यक्रम पुन्हा पूर्ववत होणार असल्याची चिन्हे आहेत.

बायडेन यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात एच १ बी व्हिसा  पुन्हा पूर्ववत करण्याचे संकेत देण्यात आले  होते. एवढेच नव्हे, तर जास्त कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असलेली एच १ बी व्हिसा मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे.

एच १ बी हा अस्थलांतरित व्हिसा असतो,  तो विशेष कौशल्ये असलेल्या परदेशी कर्मचाऱ्यांना दिला जातो.

बायडेन प्रशासन परदेशातून आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रीनकार्डची मर्यादाही वाढवणार आहे.

माहित तंत्रज्ञान कंपन्यांनाही दिलासा

एच १ बी व्हिसाच्या मदतीने भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना अमेरिकेत पाठवू शकतात. त्यामुळे या कंपन्यांनाही आता दिलासा मिळणार आहे. सध्या रोजगाराधारित व्हिसाची मर्यादा १ लाख ४० हजार आहे, ती वाढवण्यासाठी बायडेन यांचे प्रशासन निर्णय घेईल. जूनमध्ये एच १ बी व्हिसा कार्यक्रम ट्रम्प प्रशासनाने रद्द केला होता. अमेरिकी नागरिकांना रोजगार मिळावेत यासाठी हा निर्णयम् घेतल्याचे कारण त्यांनी दिले होते.