अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची चुरस अजूनही संपलेली नाही. अजूनही काही राज्यात मतमोजणी सुरु आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्यात अटीतटीचा सामना सुरु आहे. नेवाडा, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये मतमोजणी सुरु आहे. जॉर्जियामध्ये जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर छोटी पण महत्वपूर्ण आघाडी मिळवली आहे. तिथे बायडेन ९०० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहेत असे सीएनएनने हे वृत्त दिले आहे.

पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यात काटे की टक्कर सुरु आहे. एपीच्या प्रोजेक्शननुसार तिथे सुद्धा ट्रम्प यांचे मताधिक्य १८,०४२ पर्यंत कमी झालं आहे. बायडेन यांनी जॉर्जियात बाजी मारली तर १९९२ तर जॉर्जिया जिंकणारे ते पहिले डेमोक्रॅट उमेदवार ठरतील. पेनसिल्व्हेनियामध्ये अजून दोन लाख मतांची मोजणी बाकी आहे. तिथे बायडेन फक्त १८ हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी बायडेन यांना आणखी एका राज्यात विजय मिळवावा लागेल. नेवाडा, पेनसिल्व्हेनिया, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिना या चार राज्यांपैकी बायडेन यांना एक राज्य जिंकावे लागेल. बायडेन नेवाडात आघाडीवर आहेत. ट्रम्प यांच्याकडे २१३ इलेक्टोरल व्होटस आहेत. राष्ट्राध्यक्षपद कायम राखण्यासाठी त्यांना चारही राज्ये जिंकावी लागतील.