अमेरिकेने सैन्य माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी, मंगळवारी काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा ताबा तालिबानने घेतला आहे. अमेरिकेचे शेवटचे विमान धावपट्टीवरून उडाल्यानंतर तालिबानने विमानतळ ताब्यात घेतले. तरी काही अफगाणी लोक अजूनही परदेशात जाण्याच्या विचारात आहेत. तालिबानने देशाचा ताबा ताब्यात घेण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि अफगाणिस्तानातील नेत्यांमध्ये झालेल्या शेवटच्या फोनवरील संभाषणामध्ये लष्करी मदत, राजकीय रणनीती आणि संदेश पाठवण्याच्या रणनीतींवर चर्चा केली होती अशी माहिती समोर आली आहे.

या सर्व संभाषणानंतरही बायडेन किंवा अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अशरफ घनी दोघांनाही या धोक्याची जाणीव झाली नाही किंवा त्यांनी याबाबत काही तयारी केली नाही असे रॉयटर्सने म्हटले आहे. २३ जुलै रोजी सुमारे १४ मिनिटे फोनवरुन ही चर्चा करण्यात आली होती. १५ ऑगस्ट रोजी तालिबानने राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केलं. तेव्हापासून, हजारो लोक अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात १३ अमेरिकन सैनिक आणि शेकडो अफगाण नागरिक मारले गेले.

रॉयटर्सने अध्यक्षांच्या फोन कॉलवरील संभाषण जाणून घेण्यासाठी ऑडिओ ऐकला. या कॉलमध्ये जर घनी अफगाणिस्तानातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची त्यांची योजना आहे असे जाहीरपणे सांगू शकतील तर आपण मदत करु शकतो असे बायडेन यांनी म्हटले होते. “योजना काय आहे हे आम्हाला माहित असल्यास, आम्ही जवळ असलेल्या लढाऊ विमानांद्वारे मदत देणे सुरू ठेवू शकतो. या फोन कॉलच्या काही दिवस आधी, अमेरिकेने अफगाण सुरक्षा दलांना पाठिंबा देण्यासाठी हवाई हल्ले केले होते. यासंदर्भात अमेरिकेने दोहा शांतता कराराचे उल्लंघन केल्याचे तालिबानने म्हटले होते.

बायडेन यांनी घनी यांना लष्करी रणनीतीसाठी शक्तिशाली अफगाणांकडून खरेदी करण्याचा सल्ला दिला आणि याची जबाबदारी संरक्षण मंत्री जनरल बिस्मिल्ला खान मोहम्मदी यांना देण्याचा सल्ला दिला. बायडेन यांनी अमेरिकन सरकारने प्रशिक्षित केलेल्या आणि निधी दिलेल्या अफगाण सशस्त्र दलांचे कौतुक केले. “तुमच्याकडे सर्वोत्तम सैन्य आहे,” असे त्यांनी घनी यांना सांगितले. “आपल्याकडे ७०-८०,००० विरुद्ध ३००,००० सुसज्ज सैन्य आहेत आणि ते उत्तम लढण्यास सक्षम आहेत,” असे बायडेन म्हणाले, काही दिवसांनंतर, अफगाण सैन्याने तालिबानच्या विरोधात थोडीशी लढाई करून देशाच्या प्रांतीय राजधानींमध्ये घडी बसवण्यास सुरुवात केली होती.

बायडेन यांनी घनी यांना सांगितले की, “जर अफगाणिस्तानच्या प्रमुख राजकीय व्यक्तींनी नवीन लष्करी रणनीतीला पाठिंबा देत एकत्र पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली तर “हा समज बदलेल आणि माझ्या मते खूप भयंकर बदल होईल.”

बायडेन यांच्या या संभाषणावरुन त्यांना या बंडाचा आणि २३ दिवसांनी अपगाणिस्तानातील सरकार कोसळण्याचा अंदाज नव्हता असे म्हटले आहे. “तुमचे सरकार केवळ टिकून राहणार नाही, तर ते वाढेल याची खात्री करण्यासाठी आम्ही कठोर, राजनैतिक, राजकीय, आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत राहणार आहोत,” असे बायडेन यांनी म्हटले होते.