नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि महानायक अमिताभ बच्चन उपस्थित राहण्याची शक्यता नाही. देशाते पंधरावे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सोमवारी संध्याकाळी शपथ घेत आहेत. राष्ट्रपती भवनाच्या आवारात होणाऱया या सोहळ्याला देश-विदेशातील उच्चपदस्थ नेत्यांसोबत बॉलिवूडमधील तारे-तारकांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
अभिनेते अनुपम खेर, विवेक ओबेरॉय, धर्मेंद्र या सोहळ्यासाठी सोमवारी सकाळीच दिल्लीकडे रवाना झाले आहेत. लता मंगेशकर यांना प्रवास करणे सध्या शक्य नसल्यामुळे त्या शपथविधी सोहळ्याला जाणार नसल्याचे त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी सांगितले. अमिताभ बच्चन हे देखील चित्रीकरणामध्ये व्यस्त असल्यामुळे शपथविधीसाठी दिल्लीला जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.