अमिताभ बच्चन यांचे प्रतिपादन
केंद्र सरकारची बेटी बचाओ, बेटी पढाओ ही योजना म्हणजे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत महानायक अमिताभ बच्चन यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. मुलींना संरक्षण देऊन त्यांचे संगोपन करणे महत्त्वाचे असल्याचेही ते या वेळी म्हणाले.
केंद्र सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित ‘एक नयी सुबह’ या कार्यक्रमात बच्चन पुढे म्हणाले की, देशाच्या निम्म्या लोकसंख्येला आपण असुरक्षित आहोत असे वाटू नये याची आपल्याला जाणीव होण्याची ही वेळ आहे. तेही देशाच्या विकासात समान भागीदार आहेत, असेही बच्चन म्हणाले.
संस्कृतमधील मंत्राचा आधार घेत बच्चन यांनी धर्मातही महिलेला विशेष स्थान दिल्याचे सांगितले.
सरस्वती ही ज्ञानाचे प्रतीक आहे, लक्ष्मी ही संपत्तीची प्रतीक आहे तर दुर्गा आणि काली ही अनुक्रमे शक्ती आणि ताकद यांची प्रतीके आहेत, असे ते म्हणाले. सध्याच्या युगात हे वास्तवात आणण्यासाठी महिला आणि पुरुष यांना समाजात समान स्थान दिले पाहिजे, मुलांच्या प्रमाणाइतकेच मुलींचेही प्रमाण असले पाहिजे, मुलींचेही योग्य संगोपन करून त्यांना शिक्षित केले पाहिजे तर त्या आयुष्यात आपली योग्य भूमिका पार पाडतील, असेही बच्चन
म्हणाले.
बेटी बचाओ, बेटी पढाओ यामागील खरा उद्देश हा आहे की, मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव करू नये, दोघांनाही समान संधी दिल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले.