पश्चिम बंगालचे माजी परिवहन मंत्री सुवेंदु अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर गेले काही दिवस तृणमूलमधील विविध नेते भाजपात प्रवेश करताना दिसत आहेत. तशातच आता तृणमूलचे बडे नेते आणि सुवेंदु यांचे बंधू सौमेंदु अधिकारी हे आज भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुवेंदु यांनी दिली. तृणमूलच्या ५,००० कार्यकर्त्यांसह सौमेंदु संध्याकाळी ५ वाजता भाजपाप्रवेश करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- पश्चिम बंगालमध्ये ३० जागा जिंकून दाखवा – ममता बॅनर्जींचं भाजपाला आव्हान

पूर्व मिदनापूर येथे एका कार्यक्रमात बोलताना सुवेंदु यांनी घोषणा केली. माझा भाऊ सौमेंदुदेखील आज भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये त्याने केलेल्या कामाची योग्य ती दखल न घेतल्याने तो असमाधानी आहे. म्हणूनच तो आपल्या ५,००० समर्थकांसह आणि काही इतर नेत्यांसह भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. तो कोंटाई येथे सायंकाळी भाजपा प्रवेश करणार आहे. त्यामुळे आता तृणमूलचा नाश अटळ आहे, असे सुवेंदु म्हणाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

आणखी वाचा- “आता CBI सगळ्यांना पवित्र करेल”; भाजपा नेत्याचं भर कार्यक्रमात वक्तव्य

सुवेंदु अधिकारी यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी ममता यांच्यावर तोफ डागली होती. “ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत. तृणमूल काँग्रेसमध्ये मला प्रचंड मानसिक छळाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी ज्या नेत्यांनी मला त्रास दिला, ते आता मला, ‘पाठीत खंजीर खुपसणारा माणूस’ अशी उपमा देत आहेत. ममता बॅनर्जींवर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही. त्या कुणाचाच विचार करत नाहीत. मी एक गोष्ट खात्रीने सांगतो की २०२१ मध्ये होणारी निवडणूक तृणमूल काँग्रेसला जिंकता येणार नाही”, असं सुवेंदु अधिकारी म्हणाले होते.