सिंगापूरमध्ये गेल्या चाळीस वर्षांत प्रथमच मोठी दंगल झाली असून पंतप्रधानांनी दंगलीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आग्नेय आशियातील एकूण २७ जणांना आज दंगल केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्यात २४ भारतीय आहेत. एका भारतीय व्यक्तीच्या रस्ता अपघातातील मृत्यूनंतर ही दंगल उसळली होती.
भारतीयांशिवाय यात दोन बांगलादेशी व एका सिंगापूरच्या रहिवाशाचा समावेश आहे. रविवारी रात्री रस्ते अपघातात एका भारतीय कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर ही दंगल उसळली. त्यात १० पोलिसांसह १८ जण जखमी झाले.
येथील भारतीय जिल्ह्य़ात ४०० जणांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला करून १६ वाहनांचे नुकसान केले. एका खासगी बसने भारतीय पादचारी शक्तीवेल कुअरावेलू याला रविवारी रात्री ९.२० वाजता रेसकोर्स रोड व हॅम्पशायर रोड यांच्या दरम्यानच्या चौकात धडक दिली. हा भाग छोटा भारत म्हणून ओळखला जातो कारण तेथे भारतीय लोकांचे उद्योग, हॉटेल, पब आहेत.
अटक केलेले २७ जण २३ ते ४५ वयोगटातील असून त्यांना आता आरोपांना सामोरे जावे लागेल, भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने सिंगापूर येथे सांगितले की, सर्वानी शांतता पाळावी, दंगलीसारखी कृत्ये करू नयेत. उच्चायुक्त विजय ठाकूर सिंग हे सिंगापूर अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून तथ्य जाणून घेत आहेत. कुअरावेलू याच्या नातेवाईकांना त्याच्या मृत्यूची बातमी कळवली जाणार आहे. पंतप्रधान ली सेन लुंग यांनी त्याच्या मृत्यूबाबत दु:ख व्यक्त केले आहे. गृह कामकाज मंत्रालयास या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यास सांगितले आहे असे ली म्हणाले. दंगल हा फार गंभीर प्रकार असून सर्व दोषींना शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. मरण पावलेला कुअरा वेलू हा तामिळनाडूतील असून तो हेंग हप सू या बांधकाम कंपनीत दोन वर्षांपासून कामाला होता. सर्वानी शांतता पाळावी असे सिंगापूरच्या पंतप्रधानांनी फेसबुकवर म्हटले आहे. माजी पंतप्रधान टेओ ची हिन यांनी सांगितले की, बेकायदा वर्तन सहन केले जाणार नाही. पोलिसांना चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. दोन तासात दंगल आटोक्यात आणली गेली. जखमीत १० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.