उत्तर प्रदेशात विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत सहा जागा पटकावून भाजपने राज्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे तर समाजवादी पार्टीने (सपा) एक जागा जिंकली आहे.

भाजपच्या उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू चैतन चौहान यांच्या पत्नी संगीता चौहान या नौगाव सादत मतदारसंघात विजयी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे उषा सिरोही (बुलंदशहर), प्रेमपाल धनगर (तुंडला), श्रीकान्त कटियार (बंगरमऊ), सत्यप्रकाशमणी त्रिपाठी (देवरिया) आणि उपेंद्रनाथ पासवान (घाटमपूर) हे भाजपचे अन्य उमेदवार विजयी झाले आहेत.

सपाचे उमेदवार लकी यादव हे मलहानी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यादव यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार धनंजय सिंह यांचा ४६३२ मतांनी पराभव केला. सत्यप्रकाशमणी त्रिपाठी यांनी सपाचे ब्रह्मशंकर त्रिपाठी यांचा २० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. उन्नावमधील बंगरमऊ मतदारसंघात श्रीकान्त कटियार यांनी काँग्रेसच्या उमेदवार आरती वाजपेयी यांचा ३१ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

बुलंदशहरमध्ये उषा सिरोही यांनी बसपाचे उमेदवार मोहम्मद युनुस यांचे २१ हजार ७२ मतांनी तर उपेंद्रनाथ पासवान यांनी घाटमपूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कृपाशंकर यांचा २३ हजार ८२० मतांनी पराभव केला. प्रेमपालसिंह धनगर यांनी सपाचे उमेदवार महाराज सिंह यांचा तुंडला मतदारसंघात १७ हजार ६८३ मतांनी पराभव केला. या सात मतदारसंघात एकूण ८८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

तुंडला मतदारसंघातील आमदार एस. पी. सिंह बाघेल लोकसभेवर निवडून आल्याने आणि उन्नावमधील बंगरमऊचे आमदार कुलदीपसिंह सेनगर यांना बलात्कारप्रकरणी दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याने या मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली.

तेलंगणात भाजपची मुसंडी

हैदराबाद: तेलंगणमधील दुब्बक विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार एम. रघुनंदन राव विजयी झाले आहेत. राव यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आणि टीआरएसच्या उमेदवार सोलीपेटा सुजाता यांचा १०७९ मतांनी पराभव केला.राव यांना ६३ हजार ३५२ मते मिळाली तर सुजाता यांना ६२ हजार २७३ मते मिळाली. टीआरएसचे विद्यमान आमदार एस. आर. रेड्डी यांच्या निधनामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली.