बिहारमधील आरा येथे तीन नराधमांनी धावत्या ट्रेनमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. नराधमांनी धमकी दिल्याने सुरुवातीला मुलीने या घटनेची वाच्यता केली नव्हती.

बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील हसन बाजार येथे राहणाऱी १६ वर्षांची मुलगी गुरुवारी संध्याकाळी सातच्या सुमारास आरा येथे राहणाऱ्या मावशीच्या घरी जाण्यासाठी निघाली. हसन बाजार रेल्वे स्टेशनवरुन तिने ट्रेन पकडली. याच ट्रेनमध्ये तिच्याच गावात राहणारे तीन तरुण बसले होते. त्या तिघांनी मुलीची छेड काढायला सुरूवात केली. ते यावरच थांबले नाहीत. त्यांनी गरहनी स्टेशनवर त्या मुलीला ट्रेनमधून फरफटत बाहेर नेले. यानंतर तिला एका कारमधून निर्जनस्थळी नेत तिच्यावर तीन जणांनी बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास तुझ्या भावाला ठार मारू, अशी धमकी नराधमांनी तिला दिली होती. तिघेही गावातील गुंड असल्याने पीडित मुलगी घाबरली. घरी परतल्यावर तिने घटनेची वाच्यता केली नाही. शनिवारी तिने धाडस दाखवले आणि या घटनेची माहिती आई – वडिलांना दिली. त्यांनी मुलीसह पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.