डोनाल्ड ट्रम्प यांना शह देऊन जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली, हे ताजे असतानाच बिहारमधील सत्तेवर कोण वर्चस्व प्रस्थापित करणार हे मंगळवारी स्पष्ट होईल. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झालीय. सुरुवातीचे कल  पाहता एनडीए आणि महागठबंधनमध्ये अटीतटीचा सामना दिसून येत आहे. काही जागांवर महागठबंधन तर काही जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. मात्र या निवडणुकीमध्ये झालेल्या मतमोजणीपैकी केवळ १२ टक्के मतमोजणी दुपारी १२ पर्यंत झाली आहे. त्यामुळेच निवडणुकीचा अंतिम कल संध्याकाळपर्यंत समोर येईल. मात्र या निवडणुकीचे प्राथमिक कल हाती आल्यानंतर लगेचच काँग्रेसने ईव्हीएमसंदर्भात शंका उपस्थित केली आहे. पक्षाचे नेते उदित राज यांनी ट्विटवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. “चंद्रावर आणि मंगळावर जाणारी यंत्र पृथ्वीवरुन नियंत्रित केली जाऊ शकतात तर ईव्हीएम का हॅक होऊ शकत नाहीत?,” असं राज यांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा >> हातात तेजस्वी यादव यांचे फोटो आणि मासे घेऊन रस्त्यावर उतरले RJD कार्यकर्ते

“अमेरिकेमध्ये जर ईव्हीएमवर निवडणूक झाली असती तर ट्रम्प यांचा पराभव झाला असता का?”, असं ट्विट राज यांनी केलं आहे. तसेच दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी चंद्रावर आणि मंगळावर जाणाऱ्या यंत्रांवर पृथ्वीवरुन नियंत्रण ठेवता येतं तर ईव्हीएम हॅक का होऊ शकत नाही असा प्रश्न विचारला आहे.

Image

बिहारची राजधानी असणाऱ्या पाटण्यामध्ये मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर राजदच्या कार्यकर्त्यांनी महागठबंधनला मिळणारी आघाडीपासून आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी राजदचे कार्यकर्ते हातामध्ये तेजस्वी यादव यांचे फोटो घेऊन राजद जिंदाबादच्या घोषणा देत आहेत. एका हातात तेजस्वी यांचा फोटो आणि दुसऱ्या हातात पक्षाचा झेंडा घेऊन कार्यकर्ते फिरत आहेत. राजदच्या कार्यकर्त्यांच्या हाती असणारा तेजस्वी यांचा फोटो २०१५ मधील शपथविधी सोहळ्यातील आहे. या फोटोमध्ये तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दिसत आहेत. तर तेजस्वी यांचा दुसरा फोटो खूपच जुना असून त्यामध्ये तेजस्वी क्रिकेटच्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. राजदप्रमाणेच अनेक ठिकाणी भाजपाचे कार्यकर्तेही स्थानिक पक्ष कार्यालयामध्ये जमा होऊन आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.