बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. दरम्यान, आज सकाळी राष्ट्रीय जनता दलाचे माजी राज्य सचिवाची गोळी घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

बिहारचे पूर्णिया जिल्ह्यात राष्ट्रीय जनता दलाचे माजी राज्य सचिव शक्ती मलिक यांची आज सकाळी गोळी घालून हत्या करण्यात आली. यासंदर्भात डीसीपी आनंद पांडे यांनी सांगितले की, आज सकाळी शक्ती मलिक यांची त्यांच्या घरी तीन व्यक्तींनी गोळी घालून हत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, बिहार विधानसभेची निवडणूक २८ ऑक्टोबर, ३ आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून १० नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.
या निवडणुकीत जनता दल (संयुक्त) आणि भाजप यांच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसची महाआघाडी उभी राहिली आहे. तर, या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव आणि चिराग पासवान या लालू यादव आणि रामविलास पासवान या नेत्यांच्या मुलांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.