केजरीवाल यांचा नितीशकुमारांना पाठिंबा
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विधानसभेच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतलेला निर्णय बिहारमधील आम आदमी पार्टीच्या (आप) कार्यकर्त्यांना रुचलेला नसल्याचे संकेत मिळाले आहेत. केजरीवाल यांच्या सदर निर्णयामुळे काही कार्यकर्ते रामराम ठोकण्याचा विचार करीत आहेत. बिहारमधील आपच्या कार्यकर्त्यांशी कोणताही संपर्क ठेवण्यात येत नाही आणि नितीशकुमार यांना पाठिंबा जाहीर करताना आम्हाला विश्वासातही घेण्यात आले नाही, अशी राज्यातील आपच्या नेत्यांची धारणा झालेली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आपमध्ये प्रवेश करणाऱ्या परवीन अमानुल्लाह म्हणाल्या की, केजरीवाल यांनी नितीशकुमार यांना आंधळेपणाने पाठिंबा देण्याऐवजी किमान समान कार्यक्रमावर आधारित पाठिंबा द्यावयास हवा होता, परंतु केजरीवाल यांनी एकतर्फी निर्णय जाहीर केला.  बिहारमधील नेते, कार्यकर्ते यांना सहभागी करून घ्यावे, असेही केजरीवाल यांना वाटले नाही. किमान समान कार्यक्रमावर जागावाटप करून त्यानंतर सशर्त पाठिंबा द्यावयास हवा होता, असेही त्या म्हणाल्या. बिहार निवडणूक न लढविण्याचा निर्णय प्रथम घेण्यात आला आणि आता नितीशकुमार यांना पाठिंबा देण्यात आला. जद (यू) सरकारच्या गैरकारभाराविरोधात आप सातत्याने लढा देत होता, असेही त्या म्हणाल्या.