बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधीपासूनच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेल्या लोक जनशक्ती पार्टीनं ऐन वेळी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत एनडीएला धक्का दिला. त्यामुळे उमेदवारांच्या नाव निश्चितीपर्यंत पोहोचलेल्या भाजपावर पुन्हा बैठक घेण्याची वेळ आली आहे. लोजपाच्या निर्णयानंतर भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षांच्या नेत्याची बैठक बोलावली आहे.

बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. सर्व पक्ष उमेदवारांची नावं निश्चित करून याद्या तयार करण्याच्या तयारीत असतानाच भाजपाचा मित्रपक्ष व ‘एनडीए’तील घटक पक्ष लोक जनशक्ती पक्षानं अचानक स्वबळाचा नारा दिला. लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दलची नाराजी व्यक्त स्वतंत्र लढण्याची घोषणा केली.

आणखी वाचा- राजदच्या अडचणी वाढल्या; तेजस्वी यादव, तेजप्रताप यादव यांच्यावर हत्येप्रकरणी गुन्हा

लोजपाच्या या निर्णयानं भाजपाला पुन्हा बैठक बोलवावी लागली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या निवडीबाबत काल भाजपाची बैठक पार पडली होती. या बैठकीला पंतप्रधान मोदीही उपस्थित होते. या बैठकीत उमेदवारांच्या निवडीबाबत चर्चा करण्यात आली होती. भाजपाकडून उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता होती. पण, लोजपानं स्वबळाचा नारा दिल्यानं आता भाजपानं नव्या रणनितीवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. जे.पी. नड्डा पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे. या बैठकीला बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी हे सुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आणखी वाचा- बिहार विधानसभा : ‘एनडीए’त फूट; पासवानांच्या ‘लोजपा’चा स्वबळाचा नारा

लोजपानं आधीपासूनचं दिले होते संकेत

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये अस्तित्वात असलेल्या सरकारवर लोजपाकडून सातत्यानं नाराजी व्यक्त केली जात होती. विशेष निवडणुकीचे वेध लागल्यानंतर भाजपानं नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लोजपाकडून नितीश कुमार यांचं नेतृत्व स्वीकारण्यास नापसंती दिली जात होती. यासंदर्भात लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह यांच्याकडेही याबद्दल आपली नाराजी बोलून दाखवली होती.