23 January 2021

News Flash

रोजगारनिर्मितीच्या आश्वासनांची स्पर्धा

भाजपकडून १९ लाख, तर राजदचा १० लाख नोकऱ्या देण्याचा दावा

(संग्रहित छायाचित्र)

बिहार विधानसभा निवडणूक

बिहार विधानसभा निवडणुकीतील राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात ‘रोजगारनिर्मिती’ हा कायमस्वरूपी मुद्दा असतो. यंदाच्या निवडणुकीतही प्रमुख पक्षांनी त्याचा समावेश केला असून भाजपने १९ लाख रोजगार देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपचा सहकारी पक्ष जनता दल(सं)नेही तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. दोन्ही सत्ताधारी पक्षांचे जाहीरनामे गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आले.

विरोधकांच्या महाआघाडीतील राष्ट्रीय जनता दलाने १० लाख रोजगार देण्याची घोषणा जाहीरनाम्यात केली आहे, तर हाच मुद्दा काँग्रेसनेही जाहीरनाम्यात समाविष्ट केला आहे. भाजपच्या १९ लाखांच्या आश्वासनावर राजदचे नेते आणि पक्षाचे प्रमुख प्रचारक तेजस्वी यादव यांनी टीका केली. ‘भाजपने रोजगार देऊ  असे सांगितले आहे, तर राजदने १० लाख नोकऱ्या देण्याचे वचन दिले आहे. दोन्ही आश्वासनांत फरक आहे. भाजी-पावची गाडी हा देखील भाजपसाठी रोजगार असतो’, अशी टीका यादव यांनी केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात ‘एक लक्ष्य, ११ संकल्प’ असा नारा देण्यात आला आहे. करोनाची लस मोफत पुरवण्याबरोबरच उच्च शिक्षण संस्था व विद्यापीठांमध्ये ३ लाख शिक्षक भरती, बिहारमध्ये आयटी हब बनवून ५ वर्षांत ५ लाख रोजगारनिर्मिती, १ कोटी महिलांना स्वयंरोजगार, आरोग्य क्षेत्रात १ लाख नोकऱ्या, हमीभावाने धान्यखरेदी आदी ११ आश्वासने देण्यात आली आहेत. जाहीरनाम्यात सर्वाधिक भर रोजगार निर्माण करण्यावर देण्यात आला आहे.

जनता दलाचे प्रमुख व मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजदच्या १० लाख नोकऱ्यांच्या आश्वासनाची खिल्ली उडवली. इतक्या सरकारी नोकऱ्या देणार कुठून? तेजस्वी यादव राजकारणात नवे असल्याने ते बाळबोध घोषणा करतात, असे नितीश कुमार म्हणाले. पण, त्यांच्या जाहीर सभांमध्ये लालूप्रसाद यांच्या नावाने घोषणाबाजी झाल्याने नितीश कुमार संतापले होते. मत द्यायचे नसेल तर देऊ  नका पण असला गोंधळ करू नका, इथून निघून गेलात तरी चालेल, असे नितीश कुमार भरसभेत म्हणाले.

‘दिलेली आश्वासने पूर्ण होतात, आता नव्या उद्दिष्टांकडे वाटचाल’ असा नारा जनता दलाने दिला असून जाहीरनाम्यात नवी सात वचने देण्यात आली आहेत. तरुणांचे सक्षमीकरण, आरक्षित नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचा यात समावेश आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?

काँग्रेसने शेतकरी व तरुणांवर भर दिला असून पंजाबच्या आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजदरात सवलत, हमीभावाच्या  मुद्दय़ांना अग्रक्रम दिला आहे. बेरोजगार तरुणांना दरमहा १५०० रुपयांचा भत्ता, तर २.४२ लाख शिक्षकांना पुन्हा नोकरीत घेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

भाजपकडून करोना लशीचेही राजकारण – बाळासाहेब थोरात

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यास मोफत करोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे. म्हणजे करोना आजावरावरील लसीचेही भाजप राजकराण करीत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी के ली. वास्तविक पाहता, सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. परंतु  निवडणुका आहेत म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना करोनावरील लस देणार नाही का, केंद्र सरकार गोरगरिबांकडून करोना लसीचे पैसे घेणार आहे का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 12:01 am

Web Title: bihar assembly election competition for job creation promises abn 97
Next Stories
1 भारताकडून ट्विटरची कानउघाडणी
2 महिलांच्या सुरक्षेसाठी बांधील – मोदी
3 भारताची आता लस निर्मितीसाठी तयारी सुरु; केंद्र सरकार खर्च करणार ५० हजार कोटी रुपये
Just Now!
X