बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. २८ ऑक्टोबरला पहिल्या, ३ नोव्हेंबरला दुसऱ्या आणि ७ नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होईल. पहिल्या टप्प्यात ७१, दुसऱ्या टप्प्यात ९४ आणि तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होणार आहे. तर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपुष्टात येत आहे. एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार असून यामधील ३८ जागा अनुसूचित जाती आणि दोन जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव असणार आहेत”. निवडणुकीत १८ लाख ८७ हजार शेतकरी मतदान करु शकतील असं  सुनील अरोरा यांनी यावेळी सांगितलं.

करोनाच्या पार्श्वभूमीवर तयारी
करोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीनेही सर्व काळजी घेण्यात आली आहे. “सात लाख सॅनिटायजर्स, सहा लाख पीपीई किट, साडे सहा लाख फेस शिल्ड, २३ लाख हॅण्ड ग्लोव्ह्ज आणि ४७ लाख मास्कची व्यवस्था करण्यात आली,” असल्याची माहिती सुनील अरोरा यांनी दिली.

करोना रुग्णांसाठी स्वंतत्र सोय
करोना रुग्ण ज्यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे त्यांना शेवटच्या दिवशी संबंधित मतदान केंदावर जाऊन मतदान करता येणार आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली हे मतदान होईल. याशिवाय पोस्टल सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

“याशिवाय मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी होऊ नये यासाठी वेळ एका तासाने वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदान सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत सुरु असणार आहे. याआधी ही वेळ सकाळी ७ ते ५ अशी असायची,” असं सुनील अरोरा यांनी सांगितलं.