बिहारच्या मुंगेर येथे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते अजफर शम्सी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. जमालपुरमधील इवनिंग कॉलेज परिसरात त्यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार केला गेला. ज्यामध्ये शम्सी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालायत उपाचार सुरू आहेत. त्यांच्या डाव्या कानाला गोळी लागली असल्याची माहिती समोर आली आहे.

अजफर शम्सी यांचा वाहनचालक मोहम्मद मुन्नाने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, “मी दररोज प्रमाणे सकाळी ११ वाजता अजफर यांना घेऊन जमालपुर महाविद्यालय येथे पोहचलो. त्यावेळी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोठ्याप्रमाणावर विद्यार्थ्यांची गर्दी होती. त्यामुळे शम्सी कारमधून उतरून प्रवेशद्वारा जवळ गेले व तिथून कार वळवण्यास सांगितली. तेवढ्यात दोन गोळ्या झाडल्या गेल्याचा आवाज आला व गोंधळ उडाला. त्यानंतर अजफर शम्सी जखमी अवस्थेत जमिनीवर पडल्याचे दिसून आले. त्यानंतर महाविद्यालयाचे शिक्षक व अन्य जणांच्या मदतीने त्यांना त्यांच्याच कारमधून रुग्णालयात आणलं गेलं. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.” आजतकने याबाबत वृत्त दिलं आहे.

दरम्यान, घटनेची माहिती सर्वत्र पसरताच रुग्णालय परिसरात मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली आहे. पोलिसांकडून रुग्णलाय परिसरात मोठ्याप्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

मोहम्मद अजफर शम्सी हे आयटीसी लेबर यूनियनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. याचबरोबर ते जमालपूर महाविद्यालयाचे प्राध्यापक देखील आहेत. गेल्या काही दिवसांपासून आयटीसी लेबर यूनियन पदावरून त्यांचा अनेकांशी वाद सुरू असल्याचेही समोर आले आहे. एवढच नाहीतर आयटीसी लेबर यूनियन वादात अजफर शम्सी यांच्यासोबत मारहाणीची घटना देखील या अगोदर घडलेली आहे. सध्या पोलीस या गोळीबार प्रकरणी अधिक तपास करत आहे.

तर, आम्हाला माहिती मिळाली की, अजफर शम्सी हे जेव्हा त्यांच्या कार्यालयात जात होते, तेव्हा त्यांच्यावर दोन-तीन जणांकडून गोळीबार केला गेला. ज्यामध्ये ते जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. त्यांचा महाविद्यालयातील अन्य प्राध्यपकांशी वाद झाला होता, ज्यांना आम्ही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. अशी माहिती मुंगरच्या पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.