बिहार बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या कॉपी प्रकरणावर टीकेची झोड उठत असताना राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आमचे सरकार असते, तर परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना उत्तर लिहिण्यासाठी पुस्तके पुरवली असती असे विधान करून एकच खळबळ ऊडवून दिली. बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील एका शाळेच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी रविवारी पार पडलेल्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान झालेल्या कॉपी प्रकरणाविषयी बोलताना ते म्हणाले की, आमचे सरकार असते तर विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी पुस्तके उपलब्ध करून दिली असती. त्यामुळे, ज्यांना वाचता येते तेच विद्यार्थी उत्तर लिहू शकले असते. ज्यांनी अभ्यास केला नसेल ते तीन तास केवळ उत्तर शोधत बसले असते. अलिकडेच विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी चार मजली इमारतीवर चढून विद्यार्थ्यांना कॉपी करण्यात मदत केल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. या छायाचित्राची खिल्ली उडवत लालू म्हणाले, जणू पाली भिंतीला चिकटल्या आहेत असे वाटते. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेता सुशील कुमार मोदी यांनीदेखील विद्यार्थ्यांना पुस्तक उपलब्ध करून देण्याच्या लालूंच्या विधानाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले, अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठीत विद्यापीठात विद्यार्थ्यांना परीक्षेवेळी पुस्तक जवळ ठेवण्याची मुभा असते. ज्या विद्यार्थ्याने अभ्यास केला असेल तोच उत्तर देऊ शकेल या तर्कात दम असल्याचे मत व्यक्त करत ते म्हणाले, परीक्षेत पुस्तक उपलब्ध करून देणे हा एक वेगळा मुद्दा असून, कॉपी करण्याचा याच्याशी काही संबंध नाही. बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेता नंदकिशोर यादव हे सुशील मोदींच्या मताशी सहमत नसून, लालूंच्या विधानावरून राज्यातील जदयू, राजद आणि काँग्रेसचे सरकार कशाप्रकारे चालत आहे हे दिसत असल्याचे ते म्हणाले. तर लालूंचे हे विधान त्यांच्यात कोणताही बदल झाला नसल्याचे सिद्ध करण्यास पुरेसे असल्याचे मत बिहारमधील भाजपचे मुख्य प्रवक्ता आणि विधायक विनोद नारायण झा यांनी व्यक्त केले.