बिहारमध्ये बोट उलटल्याने झालेल्या अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास ४० जणांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत उलटल्याने हा अपघात झाला. बिहारची राजधानी पाटण्यामध्ये हा अपघात झाला.

प्रवासी बोट नदीत उलटल्यानंतर आठ जणांना वाचवण्यात आल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्याला वेग आला असून बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू आहे. बचाव करण्यात आलेल्या प्रवाशांवर पाटणाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने हा अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. पतंग महोत्सवावरुन माघारी परतणारे प्रवासी या बोटीत होते. बोट उलटल्यानंतर नदीत बुडणाऱ्या आठ पैकी सहा प्रवाशांना वाचवण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले. दरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.