बिहार राज्यातील बक्सरमध्ये धावत्या एक्स्प्रेसखाली बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ माजली आहे. वाराणसी- सियालदह एक्स्प्रेस बक्सरहून बरौनीच्या दिशेने जात होती. त्याचवेळी रेल्वे रुळांवर स्फोट झाला. त्यामुळे एक्स्प्रेसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या कानठल्या बसल्या. सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. या घटनेची स्थानिक पोलीस, रेल्वे पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास वाराणसी-सियालदह एक्स्प्रेसला ‘लक्ष्य’ करून बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. बॉम्बस्फोटाची तीव्रता कमी असल्याने जीवितहानी आणि मोठी वित्तहानी झाली नाही. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. बिहारमध्ये रेल्वे रुळांवर बॉम्बस्फोट झाल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मोतिहारी जिल्ह्यातील घोडहसन येथे रेल्वे रुळांवर बॉम्बस्फोट झाला होता. या घटनेची चौकशी केली असता, या घटनेमागे दहशतवादी असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करत आहे. १० संशयित आरोपींपैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, नोव्हेंबरमध्ये कानपूरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर बिहार पोलिसांनी खळबळजनक माहिती दिली होती. कानपूर रेल्वे दुर्घटना हा दहशतवादी कट होता. पाकिस्तानातील ‘आयएसआय’ने हा अपघात घडवून आणला होता, असा दावा बिहार पोलिसांनी केला होता. बिहार पोलिसांनी मोतिहारी जिल्ह्यातून मोती पासवान नावाच्या व्यक्तीला अटक केली होती. कानपूरमध्ये रेल्वे रुळांवर बॉम्बस्फोट घडवून आणल्याची कबुली त्याने दिली होती, असेही पोलिसांनी सांगितले होते. या प्रकरणी दिल्लीमध्येही काहींना अटक करण्यात आली होती.