बिहारच्या पंडार्क येथे पर्यटनासाठी आलेल्या ब्रिटिश जोडप्याला मंगळवारी एका वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. येथे गंगा नदीच्या काठावर हे जोडपे तंबूत वास्तव्य करत होते. त्यावेळी काही लोक याठिकाणी आले. त्यांनी या जोडप्याशी गैरवर्तन करत त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित जोडप्याने वेळीच तिथून पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान, पोलिसांनी या जोडप्याला लुटायचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

ब्रिटिश जोडप्याच्या दाव्यानुसार या लोकांनी त्यांना शस्त्रे दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. आम्ही गंगेच्या काठावरील तंबूत असताना दोन व्यक्ती तिथे आल्या. त्यांच्या हातात काठ्या आणि शस्त्रे होती. त्यांनी आमच्याशी गैरवर्तन करत आमच्याकडील चीजवस्तू लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही वेळीच तिथून पळ काढत नदी पार केली. त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांकडून आम्ही मदत मागितली, असे पर्यटक मॅथ्यू याने सांगितले. यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत लुटमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचा शोध घ्यायला सुरूवात केली. अवघ्या दोन तासांत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. या दोघांवर पुढील कायदेशीर कारवाई वेगाने व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच या भागात असा प्रकार पुन्हा घडणार नाही, याची काळजीही घेतली जाईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमधील फतेहपूर सिक्री येथे स्विस दाम्पत्याला चार जणांनी बेदम मारहाण करण्यात आली होती. स्वित्झर्लंडमधील क्यून्टीन जर्मी क्लर्क (वय २४) आणि त्याची प्रेयसी मारी ड्रोझ हे दोघे सप्टेंबरमध्ये भारत भ्रमंतीवर आले आहेत. रविवारी क्यून्टीन आणि त्याची प्रेयसी ड्रोझ हे दोघे फतेहपूर सिक्री येथील रेल्वे रुळावरुन चालत जात होते. यादरम्यान चार जणांनी त्यांचा पाठलाग केला. ‘आम्ही जात असताना चौघांनी आमच्याकडे बघून शेरेबाजी केली. यानंतर चौघांनी आमचा पाठलाग सुरु केला. काही वेळातच त्यांनी आम्हाला अडवले आणि मारीसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. याला विरोध दर्शवताच चौघांनी आम्हाला मारहाण केली’, असे क्यून्टीनने पोलिसांना सांगितले. लाकडी दांडक्यांनी आम्हाला मारहाण करण्यात आली. आम्ही रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होतो. मदतीसाठी याचना करत होतो. पण कोणीही आमच्या मदतीला आले नाही. याऊलट अनेक जण आमचे फोटो आणि व्हिडिओ काढत होते’ असे त्याने सांगितले.

स्विस दाम्पत्याला झालेल्या मारहाणीची परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दखल घेतली आहे. त्यांनी उत्तर प्रदेश सरकारकडून अहवालदेखील मागवला आहे. तर उत्तर प्रदेश पोलिसांनीही गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. मुकुंद हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याचा भाऊदेखील या गुन्ह्यात सामील होता. मुकुंदच्या भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.