बिहारमध्ये महाआघाडीशी फारकत घेतल्यानंतर भाजपशी हातमिळवणी करून त्यांच्या पाठिंब्यावर जेडीयूचे नेते नितीशकुमार यांनी सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विधानसभेत विश्वासदर्शक ठरावही जिंकला. आता नितीशकुमार मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आज संध्याकाळी विस्तार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तत्पूर्वी पाटणात नितीशकुमार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. त्यात मंत्र्यांच्या नावांवर चर्चा झाली. या बैठकीला जेडीयूकडून नितीशकुमार, प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह, खासदार आर.सी.पी. सिंह, तर भाजपकडून उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, नित्यानंद राय आणि नंदकिशोर यादव उपस्थित होते. आज संध्याकाळी पाचच्या सुमारास मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगण्यात येतं.

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात जेडीयू-भाजप-एलजेपी आणि आरएलएसपीच्या आमदारांनाही स्थान देण्यात येणार आहे. नवीन मंत्र्यांना आज शपथ दिली जाईल. गेल्या दोन दिवसांपासून उपचार घेत असलेले राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांना आज संध्याकाळपर्यंत रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे. त्यानंतरच मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.

दरम्यान, नितीशकुमार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जेडीयूकडून ललन सिंह, विजेंद्र यादव, कृष्णनंदन वर्मा, महेश्वर हजारी, मदन सहनी, संतोष निराला, खुर्शीद आलम फिरोज, शैलेश कुमार, जयकुमार सिंह, मंजू वर्मा आणि कपिल देव कामत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. ते आज मंत्रिपदाची शपथ घेतील. तर भाजपकडून नंदकिशोर यादव, प्रेमकुमार, रामनारायण मंडल, मंगल पांडेय, विनोद नारायण झा, सुरेश शर्मा, कृष्णकुमार ऋषी, विनोद कुशवाहा आणि राणा रणधीर हे शपथ घेतील. एलजेपीकडून पशुपति पारस हेही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचाही नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो.