सैन्यातील जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न आणि सुविधा देण्यावरून देशभरात वाद निर्माण झाला असतानाच सुरक्षा दलांच्या प्रतिमेला डाग लावणारी आणखी एक घटना घडली आहे. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात गुरूवारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर गोळीबार केला. यामध्ये चार जवानांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व जवान बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील औष्णिक उर्जा केंद्रावर सुरक्षेसाठी तैनात होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी १२.३० वाजता नाबीनगर उर्जानिर्मिती कंपनी केंद्रावर ही घटना घडली.

दरम्यान, गोळीबार करणाऱ्या जवानाची ओळख पटली असून त्याचे नाव बलवीर सिंग होते, तो कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होता. तर मृत जवानांमध्ये दोन हेड कॉन्स्टेबल, सहायक उपनिरीक्षक (एएसआय) पदावरील जवानांचा समावेश होता. प्राथमिक माहितीनुसार, या जवानाचा मानसिक तोल ढळल्यामुळे त्याने रायफलमधून इतरांवर गोळीबार केला. सुट्टी न मिळाल्याने रागाच्या भरात बलवीर सिंगने हे कृत्य केल्याचे समजत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. सुट्टी न मिळाल्याने हा जवान नाराज होता आणि त्यातूनच हे कृत्य केल्याचे दिसत आहे. या जवानाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडील बंदूकही जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती औरंगाबादचे जिल्हा पोलीस अधीक्षक सत्यप्रकाश यांनी दिली.