बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना नवी दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्समधील खासगी वॉर्डमध्ये नितीश कुमार यांना सकाळी ८.३० वाजता दाखल करण्यात आलं.

नितीश कुमार यांनी ताप आल्याची तसंच गुडघेदुखीचा त्रास होत असल्याचं सांगितल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. अद्याप त्यांना नेमका कोणता आजार झालाय हे स्पष्ट झालेलं नाही. नितीश कुमार सोमवारी तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत.

नितीश कुमार दिल्लीमध्ये २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासोबत जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी आले असल्याचं बोललं जात आहे.

भारतीय जनता पक्षासोबत २०१९ लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर असल्याचं बोललं जात आहे. जनता दल युनायटेड पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत लोकसभा २०१९ निवडणुकीसाठी भाजपासोबत जागा वाटप करण्यावर एकमत झालं आहे. मात्र त्याआधी प्रकृती बिघडल्याने नितीश कुमार यांनी सकाळी रुग्णालयात दाखल करावं लागलं.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांना गेल्या काही आठवड्यांपासून गुडघेदुखीचा तसंच डोळ्यांचा त्रास होत आहे. महिन्याच्या सुरुवातीला त्यांना ताप आला होता, ज्यामुळे महत्त्वाच्या बैठका आणि सभा रद्द कराव्या लागल्या होत्या.