बिहारमध्ये सत्ताधारी महाआघाडीमध्ये सहभागी पक्षांमध्ये राष्ट्रपती निवडणुकीवरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे सुपूत्र तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर ‘दिल की बात’ या आपल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार हे संधीसाधू आणि स्वार्थी असल्याची टीका केली आहे. तेजस्वी यांनी नितीश कुमार यांच्याबरोबर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींवरही टीकास्त्र सोडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेडिओवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’च्या धर्तीवर लालूप्रसाद यांचे धाकटे सुपूत्र तेजस्वी यांनी ‘दिल की बात’ या कार्यक्रमात बोलताना म्हटले की, संधीसाधू स्वभावामुळे आपण छोटे-मोठे फायदे मिळवू शकतो. सरकार बनवू शकतो, पाडू शकतो. पण इतिहास हा सांगतो की जेव्हा जनकेंद्रीत आणि प्रगतशील राजनीतीबाबत बोलण्यात येते तेव्हा आम्ही ठामपणे यासाठी उभे राहू शकतो. तेजस्वी यांचा इशारा स्पष्टपणे नितीश कुमार यांच्याकडे होता. नितीश कुमार यांनी राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.

तेजस्वी यादव हे राहुल गांधींवरही घसरले. ते म्हणाले, विरोधकांनी हेही समजले पाहिजे की, राजकारण हा अर्धवेळ व्यवसाय नाही. मला माहीत आहे, की विरोधकांमध्येही भ्रम आहे. काही लोकांचा चुकीचा प्राधान्यक्रम आणि आत्मकेंद्रीत स्वभावामुळे सर्व विखुरले गेले आहे.

तेजस्वी यांच्या या वक्तव्यानंतर जेडीयूनेही पलटवार केला. अशाप्रकराच्या वक्तव्यांमुळे युतीवर परिणाम होऊ शकतो, असे जेडीयूने म्हटले. काँग्रेस नेत्यांनीही तेजस्वी यांच्या या विधानाचा निषेध केला आणि महाआघाडीच्या भविष्यावरही प्रश्न निर्माण केले आहेत.

काँग्रेस आणि जेडीयूच्या पलटवारनंतर तेजस्वी यादव यांनी बचावात्मक पवित्रा स्वीकारला. आपले वक्तव्य कोणा एकासाठी नव्हते. राष्ट्रपती निवडणुकीशी माझ्या वक्तव्याचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, तेजस्वी यांच्या या वक्तव्यानंतर युतीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. आम्ही ही उत्तर देऊ शकतो. पण केवळ युतीचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही शांत आहोत, असे जेडीयूचे प्रवक्ते संजय सिंह यांनी म्हटले.